esakal | गणेश मंडळांना हवी स्थिर ढोल वादन करण्याची परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

गणेश मंडळांना हवी स्थिर ढोल वादन करण्याची परवानगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेश उत्सव मंडळाच्या समोर ढोल पथकांना स्थिर वादन करण्याकरिता परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील गणेश मंडळांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन मंडळांनी आयुक्तांना दिले असून पाच वादकांना वादन करण्याची परवानगी द्यावी, असे त्यात नमूद आहे.

सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली होत आहे. त्यामुळे यंदाही देखावे तयार न करता गणेशोत्सव साध्या पद्धतीने करावा. भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी. मंडळांनी आरोग्य सेतू ऍप वापरण्यास प्राधान्य देऊन सामाजिक उपक्रम राबवितानाही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केली आहे. याबरोबरच राज्य सरकार, पुणे महापालिकेच्या नियमांचे पालन करतानाच पुणे पोलिसांनी गणेशोत्सवासाठी आचारसंहिता तयार केली असून त्याचे पालन करण्याचेही नागरीकांना आवाहन केले आहे.

हेही वाचा: लोकलमधून पाच लाख लसवंत प्रवास करू लागले

या पार्श्वभूमीवर मंडळांच्या काही मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संजय बालगुडे, वीर हनुमान मित्र मंडळाचे दत्ता सागरे, गुरुदत्त मंडळाचे उदय महाले, पुणे बढाई समाज ट्रस्टचे शैलेश बढाई, सहकार तरुण मंडळाचे भाऊ करपे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे महेश सूर्यवंशी, गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणेश मंडळ ट्रस्टचे विलास ढमाले आदी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेऊन वादनास परवानगी देण्यात येर्इल, असे आश्वासन यावेळी आयुक्तांना मंडळांना दिली.

हेही वाचा: दापोली : बिबट्याची फासकीतून सुखरूप सुटका

मंडळांनी केलेल्या मागण्या :

-उच्च न्यायालयाने निर्देश केल्याप्रमाणे गणेश मंडळांना त्यांच्या परिसरात जाहिरात कमान टाकण्यास परवानगी द्यावी

- गणेश उत्सव मंडळाच्या समोर ढोल पथकांतील पाच जणांना स्थिर वादन करण्याकरिता परवानगी मिळावी

- २०१६ साली मान्य नियमाप्रमाणे रनिंग मंडप परवानगी द्यावी

loading image
go to top