

लोगो ः समष्टीतील गणराय
राजश्री मराठे
जनमानस आणि श्रीगणरायाचे अनुबंध
आपल्या सगळ्या देवतांच्या अपरंपार माहात्म्यासह ‘श्रीगणेशजी’ मुळारंभी विराजित आहेत. सगुणमूर्तीत अवतरलेले श्रीगणराज आज भाद्रपदातील श्रीगणेशचतुर्थीला आपल्या घराघरात, गावागावात, सार्वजनिक गणेशमंडळांच्या भव्य मंडपांमध्ये स्थानापन्न होत आहेत. हा मोरया कालातीत आहे. तो कोणा एकाचा नाही. आपल्या मनामधील भावभावना व्यक्त करण्यासाठी ‘गणपती’ ही देवता प्रत्येक भक्ताला जवळची वाटते. जणू काही हा आपला सखाच आहे आणि आपल्याला या भवसागरामधून तो पार करणार आहे, अशा भावभावनांचे कल्लोळ समाजामधील विविध प्रकारच्या लोकसाहित्य, लोकमानसामधून आपल्याला दिसतात.
प्राचीन ग्रंथ, स्तोत्र, पुराणं, गणेशगीता इत्यादी अनेकानेक ग्रंथांमधून गणराज अक्षरशब्दांमधून आपल्यासमोर आहेच. याहीपेक्षा तो लोकमानसामध्ये अधिक आहे. लोकमानसाला हे दैवत अधिक जवळचे आहे. मराठीमधील राजा सातवाहनलिखित अतिप्राचीन ‘गाथा सप्तशती’मध्येही गणपतीचा उल्लेख आढळतो. या ग्रंथात मंगलाचरणामध्ये गणपतीचे वर्णन आहे ते असे, ‘हे रसिकांनो/उपासकांनो, तुम्ही गणपतीच्या त्या अमृतरूपी आणि वक्रतुंड मुखमंडळाला नमस्कार करा. जे मुखमंडल शरण आलेल्या भक्तांनी केवळ स्मरण करताच, त्यांच्या मार्गातील सर्व विघ्नांना, संकटांना एखाद्या सिंहाने मांसाचा तुकडा झडप घालून ओढावा तशा अत्यंत सहजतेने ओढून नष्ट करते.’
या गाथेत गणपतीचे अत्यंत उग्र आणि शक्तिशाली सिंहासारखे विघ्न ओढून नेणारे रूप दाखवले आहे, ते नंतरच्या काळातील केवळ लंबोदर किंवा मोदकप्रिय शांत रूपापेक्षा थोडे वेगळे आहे. शृंगारिक आणि लौकिक जीवनावरील ग्रंथ असूनही त्याची सुरुवात गणेश वंदनेने होते. महाराष्ट्रात सातवाहन काळात इसवीसन १ व २ या शतकात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपतीच्या स्मरणाने करण्याची परंपरा घट्ट रुजली होती. सातवाहन काळातील ग्रामीण जीवनाचे वर्णन करताना घराच्या कोनाड्यात किंवा गावाच्या मंदिरात इतर देवांसोबतच मातीच्या, दगडाच्या छोट्या गणेशमूर्ती स्थापन केल्या जात. गावातील नायक, नायिका वेशीवरून, मंदिरात जाताना या गणेशमूर्तीला नमस्कार करत असल्याचा संदर्भ वेगवेगळ्या गाथांमधून येतो. ‘गणाधिपती’ असा उल्लेख करून ‘सोंडेच्या’ अग्राने समुद्राचे पाणी सहज शोषून घेऊन समुद्र कोरडा करणाऱ्या व त्यामुळे अनिर्बंध झालेल्या वडवाग्नीला आकाश व्यापू देणाऱ्या गणाधिपतीचा जय असो,’ असे वर्णन गाथेमध्ये आहे. पृथ्वी सुरक्षित, शीतल रहावी म्हणून समुद्रातील पाणी बाहेर काढून पृथ्वीमधल्या अग्नीला मोकळी वाट करून देण्याचे काम गणेशाने केले होते. हेरंब, विनायक या नावानेही गणपतीचे वर्णन सप्तशती गाथेमध्ये आले आहे. ‘गणपतीच्या गंडस्थळावरून वाहणाऱ्या मदावर भुंगे रुंजी घालत आहेत आणि त्यांचा सुंदर आवाज येत आहे. गणपती कान हलवतो तेव्हा त्याच्या वाऱ्याने भुंगे उडून जातात, अशा हेरंब, गणेशाच्या कानांमधून निघणारा पवित्र वारा तुमच्या सर्व विघ्नांना उडवून लावून तुमचा मार्ग निष्कंटक करो.’ असा आशीर्वाद या गाथेत दिला आहे. काही शृंगारिक गाथांमध्ये ‘विघ्न’ हा शब्द आला आहे. विघ्न निवारण्यासाठी गणपती हीच प्रमुख देवता असल्याने लोकमानसासाठी ‘विघ्नहर्ता गणेश’ या संकल्पनेचा हा भाषिक प्रभाव मानला जातो.
श्रीगणेशाची अशी विविध रूपे लोकांच्या मनामध्ये आहेत. त्याला आळविणारी, त्याची भावारती करणारी, भक्तिमय वातावरणामधून भजन करणारी मंडळी, पाहिली की गणपती खरंतर ग्रंथ, पोथ्यापुराणांपेक्षा माणसाच्या मनामध्ये, भावभावनेमध्ये जास्त आहे, यावर विश्वास दृढ होत जातो. आपलेही मस्तक गणरायाच्या चरणी विनम्रतेने नतं होते तसेच हातही भक्तीभावाने जोडले जातात. यावर्षी लोकमानस आणि श्रीगणरायाचे अनुबंध यामधून समष्टीत सामावलेला गणराज समजून घेत त्याची सेवा करू या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.