esakal | गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या मित्रांवर चतुर्थी दिवशीच विघ्न!
sakal

बोलून बातमी शोधा

thief

गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या मित्रांवर चतुर्थी दिवशीच विघ्न!

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी व काम करणारे खडकवासला गावातील दोन मित्र मागील वर्षापासून गणपती बसण्याच्या अगोदर गणपती मुर्ती विक्रीचा व्यवसाय करतात. आठ ते दहा दिवस गावातील मंडईजवळ शेड भाड्याने घेऊन तेथे स्टॉल लावून गणपती मुर्ती विकतात. शेवटच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व हिशोब करुन खर्च वजा करून शिल्लक राहिलेला नफा दोघांमध्ये वाटून घेतात. यावर्षी मात्र ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी या दोन मित्रांना अत्यंत वाईट अनुभव आला असून गणपती मुर्ती विकून जमवून ठेवलेल्या साठ हजार रुपयांचा डबा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे.

दिपक मच्छिंद्र मते व प्रमोद साहेबराव मते अशी या दोघा स्टॉल धारक मित्रांची नावे आहेत. दोघांनी मिळून एक शेड भाड्याने घेऊन त्यामध्ये गणपतीच्या मुर्त्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या.आठ ते दहा दिवस दररोज विक्री होत असलेल्या मुर्त्यांचे एकत्रीत पैसे एका मध्यम आकाराच्या स्टीलच्या डब्यामध्ये शेडच्या आतमध्ये कोणालाही दिसणार नाही असे ठेवले होते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच ज्यांनी मुर्तीसाठी अगोदर नोंदणी करुन ठेवली होती त्यांनी आपापली मुर्ती घेऊन जाण्यासाठी गर्दी केली होती. तसेच नवीनही ग्राहकांनी मुर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. दोघेही ग्राहकांना मुर्त्या देण्यात व्यस्त होते. गर्दी कमी झाल्यानंतर दिपक मते पुन्हा जमलेले पैसे डब्यात टाकण्यासाठी मागे गेले तेव्हा त्यांना डबा सापडला नाही. त्यांनी मित्राला बोलावून डब्याचा शोध घेतला परंतु डबा मिळून आला नाही.

हेही वाचा: मुंबईतल्या स्थितीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

दोघा मित्रांच्या आठ ते दहा दिवसांच्या कष्टावर कोणीतरी डल्ला मारला होता. शेवटी डबा चोरीला गेला असल्याचे लक्षात आल्याने दिपक मच्छिंद्र मते यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप गायकवाड हे अधिक तपास करत आहेत.

"दहा ते पंधरा मिनिटांपूर्वी मी डब्यात पैसे टाकून आलो होतो. गर्दीचा फायदा घेऊन पाळत ठेवून कोणीतरी पैशांचा डबा पळवला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आज दुसरा दिवस आहे परंतु अद्याप पोलीसांनी साधी चौकशीही केली नाही." दिपक मच्छिंद्र मते, खडकवासला.

loading image
go to top