esakal | ‘उशिरा’चं शहाणपण
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘उशिरा’चं शहाणपण

sakal_logo
By
सु. ल. खुटवड -सकाळ वृत्तसेवा

‘‘गणेशोत्सवच काय; पण पुढील चार महिन्यांच्या तारखा बुक आहेत. फेब्रुवारी २०२२ मधील तारीख देऊ का?’’ सुधीरभाऊंनी असं म्हटल्यावर समोरची व्यक्ती गयावया करू लागली. ‘सर, गणेशोत्सवानिमित्तचे व्याख्यान फेब्रुवारीत कसे जमेल. लोकं हसतील ना आमच्या मंडळाला. तुम्ही फक्त तासभर या. तुम्ही म्हणाल तेवढे मानधन देतो. शिवाय गाडीही पाठवतो.’ समोरच्या संयोजकांनी असं म्हटल्यावर सुधीरभाऊंनी ‘डायरी बघून सांगतो’ असं म्हणून उगाचच डायरीची पानं फडफडवली. ‘तुमच्यासाठी मी पुढील शुक्रवारी तासभर ॲडजस्ट करतो; पण मानधन आणि गाडी यात तडजोड होणार नाही, आधीच सांगतो,’ सुधीरभाऊंनी असं म्हटल्यावर समोरच्या व्यक्तींचा जीव भांड्यात पडला. त्यांनी ॲडव्हान्स म्हणून पाच हजार रुपये सुधीरभाऊंच्या स्वाधीन केले. त्यानंतर सुधीरभाऊंचा चेहरा उजळला.

गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपल्या वागणुकीत प्रचंड बदल केल्याने आज त्यांना हे दिवस पहायला मिळत होते. काही महिन्यांपूर्वी कोणीही त्यांना कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले की ते पटकन होकार देत असत. मानधन आणि गाडीचाही विषय नसायचा. उलट कार्यक्रम संपल्यानंतर संयोजक ‘या दोन पाहुण्यांना तुमच्या गाडीतून घरी सोडा. नाहीतरी घरी जाऊन झोपणारच आहात,’ असा विनंतीवजा आदेश देऊ लागले होते.

एखाद्या संस्थेचा पदाधिकारी त्यांना तुम्हीच कार्यक्रमांचे अध्यक्ष व्हा, असं सांगू लागल्यावर सुधीरभाऊ त्यांना त्या क्षेत्रातील चार-पाच तज्ज्ञांची नावे विनयाने सांगू लागत. ‘त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवा’ असं सांगत. त्या वेळी तो पदाधिकारी पडेल चेहऱ्याने ‘सर सगळ्यांकडे जाऊन आलो. पण कोणीच यायला तयार झालं नाही, म्हणून नाईलाजानं तुमच्याकडं आलोय. आमचे साहेब पण म्हणाले, त्या रिकामटेकड्या सुधीरभाऊंनाच बोलवा. शिवाय ते फुकट बी येतंय आणि स्वत:च्या गाडीनं येतंय. जाताना तीन-चार जणांना सोडवायला सांगू. एका दगडात आपण किती पक्षी मारतोय ते बघा.’

ठरलेल्या वेळेनुसार सुधीरभाऊ कार्यक्रमाला जात असत. मात्र, त्या वेळी तिथे दोन-तीन कार्यकर्ते व माइकवाला एवढेच असत. कार्यक्रमाला वेळेवर आल्याने एकदा एकाने सुधीरभाऊला व्यासपीठावर खुर्च्या मांडायला सांगितल्या. त्यानंतर एक प्रमुख कार्यकर्ता त्यांच्यावर खेकसला. ‘‘अजून सतरंज्या अंथरल्या नाहीत का? श्रोते काय तुमच्या डोक्यावर बसतील का? एक काम धड करता येत नाही. व्यासपीठावरील कार्यक्रमाला उशिर झाला तर अध्यक्ष काय बोंबलत नाही की पळून जात नाही,’’ असे म्हणून डाफरला. त्यावर सुधीरभाऊ म्हणाले, ‘‘अहो, मीच कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे.’’

त्यांच्याकडे अविश्वासानं पाहत तो कार्यकर्ता म्हणाला, ‘‘मला बनवता काय? अकराच्या कार्यक्रमाला प्रेक्षक बारा वाजल्याशिवाय येत नाहीत. त्यानंतर तासाभराने अध्यक्ष आणि पाहुणेमंडळी येतात. तुम्ही बरं कार्यक्रमाच्या आधी हजर झालाय. आधी कामं करा नीट. मग अध्यक्ष व्हायचं स्वप्नं बघा’’ असं म्हणत तो कार्यकर्ता निघून गेला. त्यानंतर दुसरा एक जण आला व त्याने चहाकडे लक्ष द्यायला सांगितले. शेजारच्या खोलीत हे काम करताना चहाचे डागही त्यांच्या अंगावर पडले. तेवढ्यात संस्थेचे अध्यक्ष कोणाचा तरी जाळ काढीत होते.

‘‘त्या सुधीरभाऊला आधी पकडून आणा. आता त्या येड्याला कुठं शोधत बसायचं?’’ सुधीरभाऊंनी हे सगळं ऐकलं आणि त्याच क्षणी त्यांनी स्वत:ला बदलायचं ठरवलं. आता ते कार्यक्रमासाठी कोणालाही पटकन ‘हो’ म्हणत नाहीत. गाडी आणि भक्कम मानधनाची अट घालतात व कार्यक्रमाला दोन तास उशिरा जातात. आता या सर्वांचा परिणाम म्हणजे कार्यकर्ते आणि संयोजकही त्यांच्याशी आपुलकीने वागू लागलेत. विशेष म्हणजे समाजातही आता त्यांची प्रतिष्ठाही वाढली आहे.

loading image
go to top