आनंदपर्वाचा श्रीगणेशा

शिवाजी रस्ता - गणरायाचे सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. तुळशीबाग गणपती मंडळाच्या मिरवणुकीत वाद्यवृंदाच्या पथकाने धरलेला ठेका.
शिवाजी रस्ता - गणरायाचे सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. तुळशीबाग गणपती मंडळाच्या मिरवणुकीत वाद्यवृंदाच्या पथकाने धरलेला ठेका.

पुणे - ताशांचा तर्रर्र आवाज, ढोलांचा ठेका, आकर्षक सजावट केलेले रथ अन्‌ ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, पावसाच्या तुरळक सरी, अशा भक्तिमय वातावरणात पुणेकर चिंब झाले. मंडळांमध्ये विधिवत श्रीगजाननाची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी लहान मुलांसह मोठ्यांनी उत्साहात मोदकांचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाचे स्वागत केले. मांगल्याचे, विघ्नहर्त्याचे प्रतीक असलेली बुद्धीची देवता श्रीगणेशाच्या आगमनाने आनंदपर्वाची आज सुरवात झाली.

गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू होती. गणपती मंडळांसह घरोघरी सजावटींसाठी सर्वच जण जीव ओतून काम करीत होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच सोमवारी गणपतींचे आगमन होणार असल्याने आज पहाटेपासून बाप्पांना आणण्याची तयारी सुरू झाली.

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींसह इतर महत्त्वाच्या गणपतींच्या लाकडी व चांदीच्या पालख्यांमधून, तसेच फुलांच्या आकर्षक रथातून मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते, राजकीय मंडळी सहभागी झाली होती. या मंडळांनी ठरलेल्या मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना केली. पेठांसह उपनगरांमधील अनेक मंडळांच्या मिरवणुका दिवसभर सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत ‘श्रीं’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना सुरू होती. लोकमान्य टिळक यांनी सर्वांत आधी प्रतिष्ठापना केलेल्या सरदार विंचूरकर वाड्यात लडाख, कश्‍मीरमधील मुलांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली. गणपतीच्या मिरवणुकांमध्ये मंडळांनी एक-दोन ढोल-ताशा पथकांचा समावेश केला. यामुळे शहरातील वाहतूक काही प्रमाणात विस्कळित झाली. 

दुपारी साडेबारापर्यंत गणपती बसविण्यासाठी उत्तम मुहूर्त असल्याने घरोघरी गडबड सुरू होती. लहान मुले, त्यांचे वडील, आई, आजी आजोबांसोबत ‘गणपती बाप्पा मोरया...’, ‘एक दोन तीन चार... गणपतीचा जयजय कार’ अशा घोषणा देत आनंदाने मूर्ती आणण्यासाठी बाहेर पडल्याचे चित्र सकाळपासून दिसत होते. कोणी कारमधून, कोणी रिक्षातून तर काहींनी दुचाकींवर बप्पांना घरी नेले. घरात विधिवत पूजा करून, मोदक, पेढ्यांचा, पंचपक्वान्नाचा प्रसाद दाखवून बाप्पांना विराजमान केले.

क्षणचित्रे
  सकाळी आठपासून मंडळांच्या मिरवणुका
  ढोल-ताशा पथकांकडून वादन
  परदेशी नागरिकांची उत्सुकता
  पुणेकर पारंपरिक वेशात 
  पथकांमध्ये मुलींचाही मोठा सहभाग
  कलाकारही सहभागी
  फुलांच्या रथातून ‘श्रीं’ची मिरवणूक
  ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
  गणरायासोबत सेल्फीसाठी तरुणांमध्ये चुरस
  देश-विदेशांतील छायाचित्रकारांची संख्याही मोठी
  येरवड्यातील कैद्यांच्या ढोल-ताशा पथकाकडून वादन
  बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातही जयघोष
पिंपरी - ‘मंगलमूर्तीऽ मोरयाऽऽ’च्या जयघोषात साेमवारी पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यात लाडक्‍या गणरायाचे स्वागत करण्यात आले. गणेश मंडळांनी मंडपांची उभारणी करून तर, घरोघरी सजावट करून भाविकांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली.

कसबा गणपती
मानाच्या पहिला असलेल्या या गणपतीची मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरू झाली. त्यामध्ये प्रभात बँड, श्रीराम आणि संघर्ष ढोल-ताशा पथकांनी वादन केले. सत्संग फाउंडेशनचे संस्थापक व क्रियायोगाचे अभ्यासक श्री राम यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना झाली. राम यांच्या हस्ते एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, डॉ. कमलेश बोकील, कुस्तीपटू राहुल आवारे, वेदमूर्ती गोपाळशास्त्री जोशी, उद्योगपती विशाल चोरडिया आणि गायक पं. संजीव अभ्यंकर यांना ‘कसबा गणपती’ पुरस्काराने सन्मानित केले. ‘भाऊसाहेब निरगुडकर’ पुरस्काराने निवृत्त न्यायाधीश ॲड. दिलीप कर्णिक यांना सन्मानित करण्यात आले.

तांबडी जोगेश्वरी 
मानाच्या दुसऱ्या श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढली. त्यामध्ये शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथक, गंधर्वराज बँडचा सहभाग होता. दुपारी एक वाजता श्रीची प्रतिष्ठापना इंद्रायणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन आणि धारिवाल समूहाच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते झाली.

गुरुजी तालीम
मानाच्या तिसऱ्या असलेल्या श्रींची मिरवणूक कार्यकर्त्यांनी रंगीबिरंगी फुलांच्या रथातून काढली. त्यामध्ये नादब्रह्म, गर्जना, समर्थ प्रतिष्ठान, गुरुजी प्रतिष्ठान या पथकांसह या वर्षी प्रथमच येरवडा कारागृहातील कैद्यांचे पथक सहभागी झाले. उद्योगपती विशाल व श्‍वेता चोरडिया यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली.

तुळशीबाग
मानाच्या या चौथ्या मंडळाची रथामधील हेमाडपंती गणरायाची उंच मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली. मिरवणुकीत वाद्यवृंद, भ्रदाय आणि श्री श्री रविशंकर शाळेचे ढोल-ताशा पथक यांच्या वादनाने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी प्रतिष्ठापना झाली.

केसरीवाडा
मानाचा पाचवा असलेला केसरी-मराठा ट्रस्टच्या केसरीवाड्याच्या श्रींच्या मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा या पथकांनी वादन केले. पारंपरिक लाकडी पालखीत बाप्पा विराजमान होते. दुपारी १२ वाजून ३० वाजता ‘केसरी’चे विश्‍वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com