arrest.jpg
arrest.jpg

डबल रक्कम करुन देण्याच्या बहाण्याने बनावट नोटा देणारी टोळी जेरबंद

लोणी काळभोर (पुणे) : डबल रक्कम करुन देण्याच्या नावाखाली बनावट नोटा देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या नगर जिल्ह्यातील चार जणांच्या टोळीस जिल्हा (ग्रामिण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नारायणगाव परिसरातून जेरबंद केले आहे. प्रमोद भगवान साळवे, बाबासाहेब बापू दाते (रा. कासारी, ता. पारनेर, जि. नगर), समिर दशरथ वाघ, (रा. गुर्वेवाडी, ता. पारनेर जि. नगर) व अमोल बन्सी भोसले (रा. भोसलेवाडी-टेमदरा, ता. जुन्नर) या चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले असून, वरील चारही जणांवर नारायणगाव, जुन्नर, खेड या पोलिस ठाण्यात खून, दरोडा, चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव परीसरातील बाळू कारभारी पवार या व्यक्तीस मागिल पंधरा दिवसापासून नोटा डबल करुन देण्याबाबत बाबासाहेब दाते या व्यक्तीचा वारंवार फोन येत होता. बाळू पवार यांनी सुरुवातीला फोनकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाळू पवार यांनी दाते यास, आपण नोटा डबल करुन घेण्यास तयार असल्याचे सांगितले. यावर दाते याने बाळू पवार यांना नारायणगाव शहरातील 14 नंबर चौकात समर्थ वडा पाव सेंटरजवळ दुपारी दोनच्या सुमारास बोलावून घेतले. बाळू पवार चौकात येताच, मोटारसायकलवरुन आलेल्या वरील चौघांनी पंचविस हजाराच्या बदल्यात, पाचशे रुपयांच्या नोटांचे एक बंडल बाळू पवार यांना देऊन चौघेही पसार झाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, वरील चौघेही नजरेआड होताच, पवार यांनी नोटाचा बंडल चेक केला असता, नोटांच्या बंडलमधील केवळ दोनच नोटा खऱ्या तर उर्वरीत ९८ नोटा खोट्या असल्याचे पवार यांच्या लक्षात आले. पवार यांनी तत्काळ नारायणगाव पोलिसात जाऊन फसवणुकीची तक्रार दिली. याबाबत माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, पोलिस हवालदार शंकर जम, शरद बांबळे, रौफ इनामदार, चंद्रकांत जाधव, दीपक साबळे, काशीनाथ राजापुरे व नारायणगाव पोलिस ठाण्यातील बी. वाय. लोंढे व वाय. डी. गारगोटे यांनी वरील चारही आरोपींचा शोध सुरु केला होता. सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आरोपींना नारायणगाव येथून शिताफिने ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला रात्री उशिरा यश आले. 

दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतलेले चारही जण अट्टल गुन्हेगार आहेत. चारपैकी अमोल भोसले या आरोपीच्या विरोधात आळेफाटा पोलिस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून तो गुन्हा केल्यापासून फरार होता. तर अमोल भोसलेसह चारही जणांच्या विरोधात नारायणगाव, जुन्नर,  खेड पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com