
मुंढवा - अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवामुळे केशवनगरमधील कुंभारवाड्यात गणेश मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यात मूर्तिकार मग्न आहेत. यंदाच्या महागाईमुळे गणेशमूर्ती १५ टक्क्यांनी महागणार असल्याचे कारागिरांनी सांगितले.
केशवनगर येथील कुंभारवाड्यात गणपती तयार करण्याचे सुमारे १५० कारखाने असून, येथे शाडू माती, गूळ, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ६ इंच ते १५ फुटापर्यंत लहान-मोठ्या सुमारे पन्नास हजार गणपती तयार करण्यात आल्या आहेत.
त्यांना रंगरंगोटी करण्याच्या कामाची लगबग सुरू असून, शहर व शहराबाहेरून आलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मुर्ती आरक्षित करण्यात आल्या आहेत. बालगणेश, सावकार फेटा, रेडीमेड फेटा, ड्रेपरी केलेले गणपती मुलांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असल्याचे गोराकुंभार आर्टचे महेश शिंदे यांनी सांगितले.
लालबाग, दगडूशेठ, चिंचपोकळी हे एक ते सात फुटांपर्यंत, तर अष्टविनायक, पेशवाई, लंबोदर, महाराजा, राजमुद्रा, डायमंड, शंकोच, पगडीवाला, मसुरी, गजराज, कमान गजराज, डमरू, ओम, मोर, नृत्यकरणारा, श्रीवर्धन, नटराज, नक्षी नटराज अशा अनेक मुद्रा असलेले गणपती येथे तयार असल्याची माहिती विजय आर्टचे दिलीप शिंदे यांनी दिली.
संपूर्ण कुंभारवाड्यात एक लाखाच्या वर लहानमोठे गणपती तयार होतात. दरवर्षी पुणे शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये मुर्त्या पोचविल्या जातात. काही ठोक व्यापारी, मंडळांकडून मोठ्या गणपतीची ऑर्डर देण्यात येते, असे अमोल शिंदे यांनी सांगितले.
सध्या वाढलेली मजुरी, कच्च्या मालाच्या किमतीत १० टक्के वाढ, तर रंगात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा गणपतीच्या किमतीत १५ टक्के वाढ झाली असल्याचे कारागिरांनी नमूद केले.
गुळाचा गणपती
येथील ज्ञानक आर्टने गुळापासून दोनशे गणपती बनविले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गुळाचा गणपती बनविले जातात. यामध्ये दगडूशेठ, कमळातला, चौरंगीवाला, लालबाग, नटराज व लोडवाला या प्रकारचे १० इंचापासून एक फुटापर्यंत गणपती तयार केले आहेत. पोस्टर कलरने रंगकाम केले जात असल्याची माहिती कमलेश शिंदे यांनी सांगितले.
येथे शाडू मातीच्या तीन हजार लहान मुर्त्या तयार आहेत. पर्यावरणाविषयी जागृतीने शाडू मातीच्या मूर्तींना हळूहळू मागणी वाढत आहे. मातीपासून ज्या मूर्ती बनवितो, यातून कमी पैसे जरूर मिळतात, पण कुंभार समाजाची लोप पावत चाललेली पारंपारिक कला जोपासण्याचे काम करत आहोत.
- ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानक आर्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.