

वाल्हे, ता. २६ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील यशोधन गॅस एजन्सीकडून गॅस सिलिंडर वितरणावेळी ग्राहकांना १९० रुपयांचा नवीन गॅस पाईप अनिवार्यपणे घेण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार ग्राहकांमधून होत आहे. पाईपची आवश्यकता नसल्याचे वारंवार सांगूनही तो बिलात समाविष्ट केला जात असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत ग्राहकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडर मिळण्यासाठी आधीच सुमारे ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत एजन्सीकडून १९० रुपयांचा गॅस पाईप घेण्याची सक्ती होत असल्याने ग्राहकांच्या खर्चात आणखी भर पडत आहे. आमच्याकडे आधीच चांगल्या स्थितीतील गॅस पाईप आहे. नवीन पाईपची गरज
नसतानाही तो जबरदस्तीने दिला जात आहे. पाईप न घेतल्यास गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येतील अशी भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया अनिल पवार, बाळासाहेब भुजबळ यांसह ग्राहकांनी व्यक्त केली.
या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संबंधित अन्न, नागरी पुरवठा विभाग व भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि सक्ती होत असल्यास ती तात्काळ थांबवावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
गॅस सिलिंडरसोबत गॅस पाईप खरेदीची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारींबाबत संबंधित एचपीसीएल कंपनीकडून माहिती घेण्यात येईल. कंपनीच्या नियमांमध्ये अशा प्रकारची सक्ती करण्याची तरतूद आहे का याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर संबंधित एजन्सीकडूनही खुलासा मागवून वस्तुस्थिती तपासली जाईल.
-गोपाळ ठाकरे, तालुका पुरवठा अधिकारी
गॅस पाईप देण्याची प्रक्रिया ही एचपीसीएल कंपनीच्या सुरक्षा धोरणानुसार राबविण्यात येते. ग्राहकांच्या नावावर पाईपची नोंद केली जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमाणित गॅस पाईप वापरणे आवश्यक असून कंपनीकडून उपलब्ध करून दिलेल्या पाईपची वैधता पाच वर्षांची असते. त्यामुळे ग्राहकांना वारंवार पाईप बदलण्याची गरज भासत नाही. आम्ही कंपनीच्या सूचनांनुसारच काम करत असून, ग्राहकांच्या सुरक्षिततेलाच प्राधान्य देत आहोत.
-अविनाश वाघोले, यशोधन एचपी गॅस एजन्सी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.