Video : लोभस रंगांच्या कलाविष्काराने भिंती केल्या जिवंत

नीला शर्मा
Tuesday, 5 May 2020

गौरी जगताप हिने घरातील भिंती जिवंत केल्या आहेत. गोल्डन ट्री, फुलपाखरांचे थवे, पिंजऱ्याबाहेर आलेले पक्षी, भलामोठा मोरपिसारा असं तिच्या मनातील भावविश्‍व तिनं भिंतीवर कलाकृतींमधून साकारलं आहे. वाचन, नृत्य, चित्रकला या तिच्या छंदांचा एकत्रित परिणाम तिच्या कलाविष्कारात दिसून येतो.

 गौरी जगताप हिने घरातील भिंती जिवंत केल्या आहेत. गोल्डन ट्री, फुलपाखरांचे थवे, पिंजऱ्याबाहेर आलेले पक्षी, भलामोठा मोरपिसारा असं तिच्या मनातील भावविश्‍व तिनं भिंतीवर कलाकृतींमधून साकारलं आहे. वाचन, नृत्य, चित्रकला या तिच्या छंदांचा एकत्रित परिणाम तिच्या कलाविष्कारात दिसून येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भित्तिचित्रांच्या (वॉल पेंटिंग) आविष्कारात गौरी राजेश जगताप सहजच रंगून जाते. आई (माधुरी) याने हरखून जाताना पाहणं हे गौरीला परम सुखाचं वाटतं. ती म्हणाली, ‘‘सगळ्यात आधी घरासमोरची मोठाली भिंत भरून प्रचंड आकारात मोरपिसारा रंगवला. तेव्हा आईने माझ्याबरोबर काही भाग रंगवला. मी भिंतीवर वेगवेगळी चित्रं काढते, ते आईला खूप आवडतं. मी काम सुरू करताना ती विचारते की, काय करणार आहेस ? मग ती पुढच्या टप्प्यांवर आता कुठला रंग वापरणार वगैरे विचारते.

माझ्या रंगकामाचे फोटो आणि व्हिडिओही ती मनापासून काढते. नंतर फेसबुकवर टाकते. तिच्या-माझ्यातला कमी शब्दांमध्ये होणारा खूप मोठा संवाद मला पुढे जायला मदत करतो. धाकटी बहीण गायत्रीची लुडबूड म्हणजे तिने माझे लाड केल्यासारखंच वाटतं. भरपूर वाचनातून मला आनंद तर मिळतोच, पण निरनिराळ्या कल्पना सुचतात. तऱ्हेतऱ्हेची पात्रं आणि त्यांच्या भावना जाणवायला लागतात. याचा परिणाम म्हणजे कथक नृत्य करताना मला चांगल्या प्रकारे भाव प्रकट करता येतात. लिहावंसं वाटतं म्हणून कविता आणि नाटुकलं किंवा लेख लिहिते. वाचन आणि नृत्याच्या रियाझातून चित्रांसाठी नवीन कल्पना सुचतात. पोहण्याच्या छंदामुळे व्यायाम होतो आणि सलग दोन-तीन तास भित्तिचित्र काढणं, नृत्याचा रियाझ यांसाठी माझा फिटनेस वाढतो.’’

माधुरीताईंनी सांगितलं की, माझी ही लेक थोरली. धाकटीच्या जन्मापर्यंत हिला खेळायला कुणी नव्हतं. ही लहान असताना भिंतींवर पांढऱ्या किंवा रंगीत खडूने चित्रं काढत बसायची. आम्ही तिला यासाठी रागवत नव्हतो.

उलट रंगीत खडू पुरवायचो. काही दिवसांनी आम्ही भिंती रंगवून सारख्या केल्या की, तिला चित्रांसाठी कोरी भिंत मिळायची. यातून तिची चित्रकला विकसित झाली. अलीकडेच तिने चित्रकलेच्या दोन परीक्षा दिल्या. यासाठी कुठल्याही क्‍लासला न जाता तिला उज्ज्वल यश मिळालं. शांतपणे एक-एक काम नियोजनपूर्वक करण्याचं तंत्र तिचं तिने कमावलं आहे. अत्यंत विचारपूर्वक ती भिंतीवर आधी रेखाटन करते. मग तल्लीनतेने रंग भरत जाते. पिंजऱ्यातले दोन पक्षी आणि पिंजऱ्याबाहेर आलेले दोन पक्षी तिने एका भिंतीवर काढले आहेत. यातून तिचं स्वातंत्र्यप्रेम दिसतं. ‘गोल्डन ट्री’खाली आपण मनात आणलेली इच्छा पूर्ण होते, असं तिने साहित्यात वाचलं. त्यामुळे घरातच तिने सगळ्यांसाठी मंगलकामनेपोटी चित्ररूपाने सुवर्णवृक्ष निर्माण केला. फुलपाखरांचे थवे साकारताना माझ्या लेकीच्या आत्मविश्वासाचे पंख मला मोहून घेत होते. गौरी आता नववीत गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gauri jagtap wall painting