
मार्केटयार्डात गावरान रायवळची आवक सुरू
पुणे - कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी झाल्यानंतर आता मार्केट यार्डात गावरान आब्यांची आवक सुरू झाली आहे. रविवारी (ता. 29) फळ विभागात गावरान रायवळ आंब्याची आवक झाली. दरवर्षी पुणेकर गोड, नैसर्गिकरित्या पिकलेल्या आणि रसाळ गावरान आंब्याची आवर्जून वाट पाहत असतात.
यंदा हवामान बदलामुळे उशिरा पाड आल्यामुळे गावरान हापूस आणि पायरीची आवक अद्याप झालेली नाही. पुढील 5 ते 7 दिवसात या आंब्याची देखील चव चाखण्यास मिळणार असल्याचे गावरान हापूसचे व्यापारी यशवंत कोंडे यांनी सांगितले. गेल्या वर्षी 15 मे रोजीच गावरान हापूसची आवक झाली होती. मात्र, यंदा विलंबाने होणार आहे. रविवारी 20 ट्रे रायवळ आंब्याची आवक झाली असून, एका ट्रेमध्ये साधरणपणे 8 ते 10 डझन आंबे असतात. या आंब्यची 100 ते 120 रुपये किलो भावाने विक्री झाली. मुळशी तालुक्यातील गुजरवाडी भागातून ही आवक झाली.
गेल्या वर्षी रायवळ आंब्याला सुरूवातीला डझनास 50 ते 60 रुपये भाव मिळाला होता. मात्र, यावर्षी हवामान बदलामुळे विलंबाने आवक झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट भाव मिळाला आहे. लवकरच गावरान हापूस आणि पायरी बाजारात दाखल होईल.
- यशवंत कोंडे, गावरान हापूसचे मार्केट यार्डातील व्यापारी.
रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसची आवक घटली
मार्केट यार्डात रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसची आवक घटत चालली आहे. रविवारी 700 ते 800 पेटी रत्नागिरी हापूसची आवक झाली. 4 ते 7 डझनाच्या तयार पेटीस 1500 ते 2000 रुपये भाव मिळाल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तर, कर्नाटक हापूसच्या 4 ते 5 डझनाच्या पेटीस 800 ते 1500 रुपये भाव मिळत आहे. मागील आठवड्यात कर्नाटक येथे पाऊस झाल्याने आवक घटली आहे. त्यातही चांगल्या प्रतीच्या मालाचे प्रमाण कमी असल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.
Web Title: Gavaran Raiwal Arrives At The Market Yard
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..