अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते कळसूबाईच्या घटकलशाचे पूजन कळसूबाई मित्र मंडळाचा तीन दशकांपासून अखंड नवरात्र उपक्रम; गिर्यारोहकांच्या भक्तीच्या शक्तीचे कौतुक पहिल्या माळीला गडावर गर्दी

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते कळसूबाईच्या घटकलशाचे पूजन कळसूबाई मित्र मंडळाचा तीन दशकांपासून अखंड नवरात्र उपक्रम; गिर्यारोहकांच्या भक्तीच्या शक्तीचे कौतुक पहिल्या माळीला गडावर गर्दी
Published on: 

AKL26B18900
घोटी ः अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला घोटी येथे घटकलशाचे पूजन केले. समवेत मान्यवर.

कळसूबाई शिखरावर घटस्थापना
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते घटकलशाचे पूजन
घोटी, ता. ११ : महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरावर गेल्या तीन दशकांपासून नवरात्रोत्सवात अखंड घटस्थापना करून नऊ दिवस दररोज शिखर सर करण्याचा अनोखा उपक्रम घोटी येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी जपला आहे. या आगळ्यावेगळ्या भक्ती आणि धाडसाची दखल घेत अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला घोटी येथे घटकलशाचे पूजन केले.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी पूजनानंतर घटकलश मंडळाच्या गिर्यारोहकांकडे सुपूर्द केला. कळसूबाई मातेप्रती असलेल्या गिर्यारोहकांच्या श्रद्धेचे आणि सातत्यपूर्ण उपक्रमाचे त्यांनी कौतुक करीत नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. नवरात्रोत्सवात कळसूबाई मातेच्या दर्शनाला येण्याचे निमंत्रणही त्यांनी स्वीकारले.
कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली १९९७ पासून हा उपक्रम अखंड सुरू आहे. व्यवसाय, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत मंडळाचे गिर्यारोहक नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करतात. दररोज पहाटे कळसूबाई शिखर सर करून शिखरस्वामिनी कळसुआईची मनोभावे पूजा करतात. विजयादशमीपर्यंत हा धार्मिक उपक्रम सुरू असतो.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गिर्यारोहकांनी पहाटे कळसूबाई शिखर सर केले. उगवत्या सूर्याच्या किरणांच्या साक्षीने सर्वोच्च शिखरावर घटस्थापना करून कळसूबाई मातेची पूजा व आरती करण्यात आली. शिखर सर करण्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता, जिद्द आणि सातत्य यांचा संगम या उपक्रमातून दिसून येतो.
कळसूबाई शिखर सर करणे हे अनेकांसाठी आव्हानात्मक असताना मंडळाचे गिर्यारोहक गेल्या तीन दशकांपासून न थकता आणि न थांबता हा उपक्रम राबवीत आहेत. त्यामुळे त्यांच्या श्रद्धा, सामूहिक प्रयत्न आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमात भगीरथ मराडे, अभिजित कुलकर्णी, रामदास चौधरी, कुंडलिक भोपे, निलेश पवार, प्रवीण भटाटे, संजय शर्मा, सुधाकर तांबे, निलेश आंबेकर, ज्ञानेश्वर मांडे, अशोक हेमके, बाळू आरोटे, भगीरथ म्हसने, नामदेव जोशी, सागर पलटणे, कृष्णा गहिले, नितीन भागवत, भानुदास जाधव आदी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com