अध्यक्षांच्या एककल्ली कारभारामुळे ‘घोडगंगा’ आर्थिक संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ghodganga Sugar Factory

शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे चांगल्या स्थितीत असणारा हा सहकारी साखर कारखाना आता आर्थिक संकटात सापडला आहे.

अध्यक्षांच्या एककल्ली कारभारामुळे ‘घोडगंगा’ आर्थिक संकटात

पुणे - शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे चांगल्या स्थितीत असणारा हा सहकारी साखर कारखाना आता आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी कारखान्‍याला २१ कोटी रुपयांचा तोटा झाला असून कामगारांचे पगार गेल्या सात महिन्यांपासून थकले आहेत. कारखान्याच्या या आर्थिक नुकसानीला अध्यक्ष पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप या कारखान्याचे माजी संचालक ॲड. सुरेश पलांडे, दादा पाटील फराटे आणि विद्यमान संचालक सुधीर फराटे यांच्यासह काही आजी-माजी संचालकांनी मंगळवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत बोलताना केला.

या कारखान्याला पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी व शेतकऱ्यांची गळचेपी थांबविण्यासाठी कारखान्याच्या येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षांना जाब विचारणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.कारखान्याच्या आर्थिक नुकसानीची माहिती देण्यासाठी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी ज्येष्ठ संचालक पांडुरंग थोरात, मांडवगण विकास सोसायटीचे अध्यक्ष गोविंद फराटे, ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, सरपंच रमेश पलांडे आदी उपस्थित होते.

पलांडे म्हणाले, ‘शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादनाची क्षमता ३० ते ३५ लाख मेट्रीक टन इतकी आहे. परंतु घोडगंगा साखर कारखान्याने केवळ ६ लाख ३० हजार मेट्रीक टन इतके कमी गाळप केले आहे. यामुळे कारखान्याला २१ कोटी ५४ लक्ष ६६ हजार रुपये इतका प्रचंड तोटा झाला आहे. परिणामी अन्य साखर कारखान्यांच्या तुलनेत घोडगंगा कारखाना हा ऊस उत्पादक सभासदांना प्रति टनामागे किमान ५०० ते कमाल १२०० रुपये इतका कमी भाव दे लागला आहे. अध्यक्ष अशोक पवार हे मागील सलग २५ वर्षांपासून कारखान्याचा कारभार पाहत आहेत. सन २००९-१० मध्ये कारखान्याची गाळप क्षमता ही अडीच हजार टनांवरून पाच हजार टन इतकी विस्तारवाढ करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली.

सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी सभासद व शेतकऱ्यांकडून ७ कोटी ७५ लाख रुपये जमा करून घेण्यात आले. मात्र, अध्यक्ष पवार यांनी कारखान्याची विस्तारवाढ न करता ‘घोडगंगा’च्या कार्यक्षेत्रात जवळच्या नातेवाइकांच्या मालकीचा असलेला व्यंकटेशकृपा हा खासगी साखर कारखाना उभारण्यास अप्रत्यक्ष मदत केली आहे. त्यांच्या नातेवाइकांच्या या खासगी कारखान्याला ऊस मिळाला पाहिजे, या हेतूने त्यांनी जाणीवपूर्वक घोडगंगा कारखान्याची विस्तारवाढ केली नाही.’’

आर्थिक नुकसानीला भाजप सरकार जबाबदार - अशोक पवार

सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखान्याने १०० कोटी रुपये खर्च करून सह-वीजनिर्मिती प्रकल्पाची उभारणी केली. हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित केला. परंतु राज्यातील तत्कालीन भाजप पुरस्कृत महायुती सरकारने जाणीवपूर्वक वीज खरेदी करार (पीपीए) वेळेत केला नाही. यामुळे या प्रकल्पातून वीजेचे उत्पादन करूनही त्यातून पैसे मिळू शकले नाहीत. परिणामी कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या आर्थिक नुकसानीला तत्कालीन भाजप सरकार हेच जबाबदार असल्याचा आरोप रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. अशोक पवार यांनी केला आहे. या कारखान्याबाबत काही आजी-माजी संचालकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, त्यात काहीही तथ्य नाही. केवळ व्यक्तिद्वेषातून त्यांनी हे आरोप केले आहेत. व्यंकटेशकृपा या खासगी साखर कारखान्याशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्या नावावर या कारखान्याचे शेअर्ससुद्धा नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.