esakal | घोरपडी - पावसाच्या पाण्यात मिसळले केमिकलयुक्त पाणी I Chemical Water
sakal

बोलून बातमी शोधा

घोरपडी - पावसाच्या पाण्यात मिसळले केमिकलयुक्त पाणी

घोरपडी - पावसाच्या पाण्यात मिसळले केमिकलयुक्त पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घोरपडी - काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे घोरपडी परिसरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. यातून मार्ग काढणे कसरतीचे झाले असताना भारत फोर्स कंपनी समोरील रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अचानक केमिकलयुक्त पाणी वाहू लागले. रस्त्यावरील झाडे, टपऱ्या, वाहने, कचरा अगदी रस्त्यावरील कुत्रे व इतर जनावरे काळी पडले. काही नागरिकांच्या घरातही हे पाणी शिरले. रासायनिक पाणी पावसाच्या पाण्यात मिसळल्याने नागरिकांचा या पाण्याशी थेट संपर्क आल्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोमवारी रात्री सात नंतर पुणे शहरात पावसाचा जोर वाढल्यावर घोरपडी मध्ये विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस पडला. यामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणावर पाणी साचले. त्यावेळी साचलेल्या पाण्यात अचानक पाण्यात काळ्या रंगाचे केमिकल वाहत येऊ लागले. वीज नसल्यामुळे पाणी काळे दिसत असल्याचे चर्चा सुरू झाली. काही वेळानंतर मात्र पाण्याचा वेगळा दुर्गंध आणि चिकटपणा यामुळे केमिकल असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत रस्त्यावरील झाडे, टपऱ्या, वाहने यामध्ये केमिकल अडकले. पावसात प्रवास करणारे नागरिक व कचरा काढण्यासाठी मदत करणाऱ्या मुलांचे कपडे आणि हातही काळे पडले. या केमिकल युक्त पाण्याचा निगडे वस्ती, जाधव वस्ती, सिद्धिविनायक पार्क, इंडिया पार्क, ढवळे वस्तीमधील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

हेही वाचा: बारामती : भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

सकाळी महानगरपालिकेच्या वतीने शेकडो किलो केमिकलयुक्त कचरा उचलण्यात आला. तरीही रस्त्याच्या कडेचे झाडे, रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, दुचाकीवर आणि टपऱ्यावर मात्र मोठमोठे काळे डाग पडले आहेत.

राकेश वाल्मिकी, स्थानिक नागरिक

रात्रभर या काळ्या पाण्याने आमच्या वस्तीतील नागरिक हैराण झाले, या पाण्याने भरलेले हात साबण, रॉकेल इतर साधने वापरून ही स्वच्छ झाली नाहीत. रस्त्यावरील कुत्रे व इतर जनावरांचे पाय काळे पडले आहेत. परिसरातील कंपन्या ड्रेनेज लाईनमध्ये त्यांचे केमिकल युक्त पाणी सोडतात यावर वांरवर तक्रार करून कारवाई केली जात नाही. जर उद्या यामुळे नागरिकांच्या आरोग्याला काही हानी झाली तर याला कोण जबाबदार आहे?

ज्ञानदेव सुपे, सहाय्यक आयुक्त , ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय

अचानक रात्री पाऊस पडला तेव्हा हे केमिकलचे पाणी रस्त्यावर आले. पालिकेच्या वतीने सकाळी परिसरात साफसफाई करण्यात आली आहे. हे पाणी कुठून आले याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही, त्याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यात येईल.

loading image
go to top