गुंड नको म्हणता; अजित पवारांना घरी बसवा 

संभाजी पाटील
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सरकार पाच वर्षे कारभार करेल 
"लोकसभा, विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसला पुणेकर-पिंपरीकरांनी घरे बसविले. सत्ता गेल्याने अजित पवारांची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी झाली आहे. त्यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्‍न बनला आहे; पण गेल्या 10 वर्षांत तुम्ही एवढी घाण करून ठेवली आहे, त्यामुळे या निवडणुकीतही मतदार तुम्हाला घरचाच रस्ता दाखवतील यात शंका नाही. पुण्याची सत्ता तर जनता आम्हाकडे सोपवेलच; पण राज्य सरकारही पाच वर्षे खणखणीत कारभार करेल. सरकार पडण्याची वाट पाहणाऱ्यांना केवळ स्वप्नच पाहावे लागेल,'' असा टोलाही बापट यांनी लगावला. 

पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग इतरांना सल्ला द्यावा,'' अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी भाजपवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले.

विकास आराखड्याची योग्य अंमलबजावणी, मेट्रो, रिंगरोडपासून प्रदूषणमुक्त पुणे हा आपला शब्द आहे. त्यामुळे सुज्ञ पुणेकर या निवडणुकीतही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच विश्‍वास ठेवतील, असेही त्यांनी 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

प्रश्‍न : या निवडणूक प्रचारात सर्वच पक्षांनी भाजपलाच टार्गेट केले, याबाबत काय वाटते? 
बापट : भाजप सत्तेवर येणार हेच यातून स्पष्ट झाले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांची वाताहत झाली आहे. त्यांच्या हातात काहीही मुद्दे नाहीत, त्यामुळे भाजपवर टीका करा, गुंडांना उमेदवारी दिली, असा अपप्रचार करा, असे सुरू आहे. गुंड कोणाकडे आहेत, याची यादी काढा. कारण, ते विकासाच्या मुद्‌द्‌यावर बोलूच शकत नाहीत. पुण्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. संपूर्ण शहराचे नियोजन बिघडवले. वाहतुकीच्या व्यवस्थापनाचा, पीएमपीचा खेळखंडोबा केला. त्यामुळे त्यांना आरोप करू द्या. आम्ही फक्‍त शहराच्या विकासावर बोलू. शहरासाठी काय करणार यावरच लक्ष देऊ. पुणेकर गावगप्पांना नाही, तर विकासावर कोण बोलतो, यावरच मत देणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना नाही, तर पुणेकरांच्या हिताला आम्ही महत्त्व देतो. आमच्या 99 टक्के सभा यशस्वी झाल्या; पण काही मुद्दे नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या सभेचा विषय काढता, हे हास्यास्पद आहे. 

प्रश्‍न : पुणे महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी मतदान आहे. याला सामोरे जाताना आपल्या पक्षाचा "अजेंडा' काय? 

बापट : गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे हाच आमचा अजेंडा. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या गलथान कारभारामुळे पुण्याचा विकास खुंटला होता. जी कामे त्यांनी 15 वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही केली नाहीत, तीच कामे आम्ही केवळ दोन वर्षांत मार्गी लावून दाखविली. त्यात पुणे मेट्रो प्रकल्प असेल, पीएमआरडीए असेल, विकास आराखडा, जायका प्रकल्प, पुरंदर विमानतळ अशी यादीच्या यादी सांगू शकतो. इतक्‍या कामांना भाजप सरकार आल्यावर गती मिळाली. शाब्दिक कोट्या, आरोप-प्रत्यारोप निवडणुकीपुरते गाजतात; पण तुम्ही केलेली विकासकामांची दखल लोक पिढ्यान्‌पिढ्या घेतात. 

प्रश्‍न : मेट्रो प्रकल्प, विकास आराखडा, पीएमआरडीएसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प का रखडले? 
बापट : या प्रश्‍नाचे उत्तर एका वाक्‍यात द्यायचे झाले, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निष्क्रियतेमुळे. शहराचा सुनियंत्रित आणि समतोल विकास होणे, ही गरज होती; पण दुर्दैवाने तसे झाले नाही. आम्ही सत्तेत येताच पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सक्रिय प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मी याचा सखोल अभ्यास केला. या समितीच्या माध्यमातून आम्ही पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 950 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. यासाठी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, नितीन गडकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामुळेच रखडलेला मेट्रो प्रकल्प रुळावर आला. 

प्रश्‍न : पुरंदर विमानतळ घोषणा तुम्ही केलीत; पण होण्यापूर्वीच विरोध होत आहे, यातून तुम्ही कसा तोडगा काढाल? 
बापट : शेतकऱ्यांचा विरोध होणे साहजिक आहे. कारण, याआधीच्या सरकारने प्रकल्पाच्या नावाखाली प्रस्थापितांवर अन्याय केल्याची अनेक कटू उदाहरण आहेत; परंतु आमचे सरकार तसे कधीच करणार नाही, हा आम्ही शब्द देतो. शेतकऱ्यांशी योग्य तो समन्वय साधूनच आम्ही पुढील पावले उचलू. मला खात्री आहे की त्यांचाही या प्रकल्पाला पाठिंबा लाभेल आणि येत्या काही वर्षांत पुरंदर येथील सुसज्ज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज असेल. 

प्रश्‍न : मुळा-मुठा नदी मोकळा श्‍वास कधी घेणार? आमदार असताना हा प्रश्‍न सोडविण्यात आपल्याला अपयश आले, असे वाटते का? 
बापट : अपयश आले असे म्हणता येणार नाही. कारण, आमदार निधीच्या मर्यादेतून जेवढी कामे करणे शक्‍य होती, तेवढी कामे मी केली. माझ्याकडे त्या कामांचा लेखी आढावाही आहे; परंतु नदी सुधारणासारखा व्यापक प्रकल्प राबविताना त्यासाठी मोठ्या निधीची तरतूद असावी लागते. आमचे सरकार आल्यावर आम्ही जायका प्रकल्पाच्या माध्यमातून महत्त्वाची पावले उचलली. यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले. मी स्वत: जपानला भेट देऊन "जायका' संस्थेशी चर्चा केली. त्यानंतर केंद्र सरकारला 900 कोटी रुपयांचे कर्ज अल्पदरात उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय "जायका'ने घेतला. त्यामुळे नदी स्वच्छ करू, असा माझा शब्द आहे. 

प्रश्‍न : "स्मार्ट सिटी' वरून अनावश्‍यक राजकारण झाले, असे वाटते का? 
बापट : होय अर्थातच. देशातील शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत, या दूरदृष्टिकोनातून "स्मार्ट सिटी' प्रकल्पाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली; पण केवळ राजकीय विरोधापोटी महापालिकेत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने या प्रकल्पाला विरोध करून हा ठराव नामंजूर केला; पण पुण्याच्या विकासाचा ध्यास समोर ठेवून व मुख्यमंत्र्यांसोबत विचारविनिमय करून हा विषय राज्य सरकारच्या अधिकारात आम्ही सामावून घेतला. आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या प्रकल्पात पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही सहभागी करून घेतले. आता विविध सुविधा व विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही पुण्याची वाटचाल समृद्धीच्या दिशेने नेऊ, हे मी आपल्या माध्यमातून सर्व पुणेकरांना वचन देतो. 

प्रश्‍न : महापालिकेत सत्तेसाठी युती करण्याची वेळ आली, तर तुम्ही शिवसेनेसोबत युती करणार का? 
बापट : "जर आणि तर' याला राजकारणात महत्त्व नाही. राजकारण हे गणित नव्हे. जे काय होईल ते 23 तारखेला कळेलच. आम्ही दोन वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे पुणेकर आम्हाला बहुमताने निवडून देतील. पुणे महापालिकेत परिवर्तन होईल. भ्रष्ट कारभाराला येथील जनता कंटाळली आहे. पार्लमेंट ते पंचायत आता कमळच फुलेल. 

प्रश्‍न : पुणेकरांनी भारतीय जनता पक्षाला का निवडून द्यावे, असे वाटते? 
बापट : महापालिकेत सत्ता नसतानाही आम्ही गेल्या 2 वर्षांत पुण्याशी संबंधित अनेक रखडलेले प्रश्‍न मार्गी लावले. पुणेकरांनी एकहाती सत्ता आम्हाला दिली, तर कामे वेगाने मार्गी लागतील. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारकडे इतकी वर्षे सत्ता असतानाही ते जे करू शकले नाही, ते आम्ही करून दाखवू, असे आश्‍वासन नव्हे, तर वचन देतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girish bapat calls ajit pawar goonda in interview with sakal