खड्डे प्रश्‍नावर बापट शांत, तर श्‍वेत पत्रिका काढण्याची राष्टवादीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.

खड्डे प्रश्‍नावर बापट शांत, तर श्‍वेत पत्रिका काढण्याची राष्टवादीची मागणी

पुणे - शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने पुणेकर त्रस्त असताना खासदार गिरीश बापट यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खड्ड्यावर चर्चाच केली नाही. माझे इतर महत्त्वाचे विषय होते, त्यामुळे चर्चा केली नाही, असे बापट यांनी सांगितले. तर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या बैठकीत खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करून, शहरात रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षातील रस्त्याच्या कामाची श्‍वेत पत्रिका काढावी अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.

मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. अवघ्या तीन चार महिन्यापूर्वीच रस्ते डांबरीकरण केलेले आहेत, त्या रस्त्यांची देखील चाळण झालेली आहे. एकीकडे खड्डे पडलेले असताना दुसरीकडे रस्ते दुरुस्तीचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. खासदार गिरीश बापट यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची महापालिकेत भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांची आयुक्तांसोबत बैठक झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दत्ता धनकवडे आदी यावेळी उपस्थित होते.

मेट्रो, जायका, घोरपडीचा रेल्वे पूल याचा आढावा

पत्रकारांशी बोलताना बापट म्हणाले, ‘संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित विषयांवर आयुक्तांशी चर्चा केली. खडकी येथील थांबलेले मेट्रोचे काम सुरू करण्यासाठी भूसंपादन लवकर करावे अशी सूचना केली. विमानतळावर येथे महापलिका रस्ता तयार करून त्यासाठी महापालिका लष्कराला ३५ लाख रुपये भाडे देणार आहे. घोरपडी येथील रेल्वे पूल, जायका प्रकल्पाचे काम याचा आढावा घेतला. डीआरडीओ तर्फे देशभरात मोठे पूल बांधण्यात आलेले आहेत. त्याचा फायदा पुणे शहराला येऊ शकतो, त्याबाबत आयुक्तांना माहिती देण्यात आली. आयुक्त आणि महापालिकेचे अभियंते लवकरच भेट देऊन त्याची माहिती घेतील. पुण्यातील खड्ड्यांची चर्चा झाली नाही. बाकीचे महत्त्वाचे प्रश्न होते, नंतर मी बोलून वेगात खड्डे बुजवा अशा सूचना देईन. शहरातील खड्ड्यावर चर्चा झाली पाहिजे , पाणी वाहून जाण्याची व्यवस्था झाली पाहिजे अन्यथा खड्डे पडतात. त्यादृष्टीने उपाययोजना आवश्यकता आहे,असेही बापट यांनी सांगितले.

सिंहगड रस्त्यावरील पुलाची लांबी वाढवा

सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या विषय उपस्थित केला. या पुलाची लांबी वाढवावी अशी मागणी नागरिकांची आहे हे सांगितले. त्यावर आयुक्तांनी या भागात भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली जाईल असे सांगितले आहे. शहराच्या सर्वच भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पुढील सात दिवसात सर्व खड्डे बजुवा अन्यथा याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल असे सांगितले. रस्ता केल्यानंतर तो पहिल्याच पावसात वाहून जात असल्याने हे रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामाची श्‍वेत पत्रिका काढावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. स्वारगेट येथून कात्रज पर्यंत मेट्रोचा विस्तार, कचरा संकलन, २३ गावातील पाणी पुरवठा याचा आढावा घेतला.

कलम १९ बदलण्याचा प्रयत्न

संसदेच्या आवारात शांततेच्या मार्गानेही आंदोलन करण्याचा हक्क केंद्र सरकारने काढून घेतला आहे. ही सरकारची दडपशाही असून, संविधानातील कलम १९ मध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. पेट्रोलचे दर २० रुपयांनी कमी करावेत अशी मागणी भाजपची होती, पण त्यांनी ५ रुपये कमी केले. त्यात परत जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

Web Title: Girish Bapat Calm On Issue Of Pune Pits Ncp Demands To Issue A White Paper

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Girish BapatpuneNCP
go to top