दादांचा बालेकिल्ला आम्ही मिळविणारच - गिरीश बापट

- मिलिंद वैद्य
शनिवार, 21 जानेवारी 2017

पिंपरी- अजित दादांच्या हुकूमशाहीला त्यांचेच कार्यकर्ते कंटाळले आहेत, असा सणसणीत टोला लगावत पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. पिंपरी-चिंचवडला हा त्यांचा बालेकिल्ला ढासळू लागला आहे. लोकशाही मार्गाने संघर्ष करून आम्ही तो मिळवूच, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी- अजित दादांच्या हुकूमशाहीला त्यांचेच कार्यकर्ते कंटाळले आहेत, असा सणसणीत टोला लगावत पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. पिंपरी-चिंचवडला हा त्यांचा बालेकिल्ला ढासळू लागला आहे. लोकशाही मार्गाने संघर्ष करून आम्ही तो मिळवूच, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शुक्रवारी गिरीश बापट "सकाळ'शी बोलत होते. आपल्या मार्मिक शैलीत बापट यांनी दिलखुलास बातचीत केली. ते म्हणाले, ""गेली दहा-पंधरा वर्षे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. हुकूमशाही पद्धतीने त्यांनी सत्ता उपभोगली. दादांच्या हुकूमशाहीला, दादागिरीला त्यांचेच कार्यकर्ते वैतागले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीला गळती लागली आहे. स्वाभिमानी लोक त्यांच्यापासून दुरावत आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवडच्या जनतेला गृहीत धरू नये.''

दहा पैशाचा विकास अन्‌ रुपयाची प्रसिद्धी
"आम्ही शहराचा विकास केला', या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दाव्याची बापट यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून त्यांची सत्ता आहे. त्यांना अपेक्षित विकास करता आला नाही. पुणे व पिंपरी शहरासाठीचा रिंगरोड, विकास आराखडा, म्हाडाचे गृहप्रकल्प, पुणे महानगर विभाग विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), उड्डाण पूल, असे कोणतेही प्रकल्प असो, ही कामे अनेक वर्षे रखडली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 250 एकर जागेत अतिक्रमण झाले. ते कोणी केले. "दहा पैशाचा विकास आणि एक रुपयाची प्रसिद्धी', "काम कमी आणि बोभाटा जास्त' आहे. याला विकास म्हणायचा का?''

नोटाबंदीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस अपप्रचार करीत असल्याचा आरोप करून बापट म्हणाले, 'नोटाबंदीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतलेली भूमिका चुकीची आहे. ते अपप्रचार करून जनमानसात चुकीचा संदेश पोचवीत आहेत. पुणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहा नगर परिषदांच्या निकालातून जनतेनेच त्यांना चोख उत्तर दिले आहे.''

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपच विजयी होणार आहे. युती झाली तर युतीचा, नाही तर भाजपचा विजय निश्‍चित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप हा गुंडांचा पक्ष होत आहे. भ्रष्टाचारी लोक भाजपला कसे चालतात, असा आरोप राष्ट्रवादीकडून होतो त्यावर 'जे लोक कालपर्यंत त्यांना सज्जन वाटत होते, ते भाजपमध्ये आल्याबरोबर गुंड, भ्रष्टाचारी कसे झाले?'' असा थेट सवाल त्यांनी केला. भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये स्थान नाही. उलट राष्ट्रवादी कॉंग्रेसने आजवर केलेल्या भ्रष्टाचाराचे प्रत्येक प्रकरण आम्ही शेवटपर्यंत तडीस नेऊ. येणाऱ्या निवडणुकीसाठी भ्रष्टाचारी राष्ट्रवादीला सत्तेवरून खाली खेचणे हाच आमचा मुद्दा असेल, असेही ते म्हणाले.

सत्तेवर आल्यावर आम्ही जनतेसाठी पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करणार आहोत. तोच आमचा जाहीरनामा असेल, असेही पालकमंत्री गिरीश बापट यांनी शेवटी स्पष्ट केले.

Web Title: girish bapat talking to ajit pawar