esakal | आई, मुलासह मलाही घेरलं, पण...

बोलून बातमी शोधा

Girish Joshi

आई, मुलासह मलाही घेरलं, पण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘गेल्या महिन्यात एके दिवशी अचानक ताप आला. तो जरा वाढल्याने फॅमिली डॉक्टरांना दाखविले. त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यायला सांगितली. ती पॉझिटिव्ह आली. पाठोपाठ ८४ वर्षाची आई आणि २६ वर्षांचा मुलगाही आठवडाभराच्या अवधीत पॉझिटिव्ह आले. सर्व परिस्थितीला मोठ्या धैर्याने सामोरे गेलो. आता तिघेही ठणठणीत बरे आहोत...’, विश्रांतवाडी येथे राहणारे गिरीश जोशी सांगत होते.

जोशी हे आर. ॲण्ड डी. ए. मध्ये नोकरीस आहेत. उत्साही आणि मदतीसाठी तत्पर असलेल्या गिरीश यांना स्वतः पॉझिटिव्ह आल्याचा फारसा धक्का बसला नाही. परंतु, आई पॉझिटिव्ह आल्यावर धास्तावलो. ते म्हणाले, ‘‘गेल्या महिन्यात एक दिवस ताप आला. परिस्थिती पाहता लगेच डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेतली. परंतु तापाबरोबर अशक्तपणाही जाणवायला लागल्याने डॉक्टरांनी कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. ती पॉझिटिव्ह आली. मात्र फार त्रास नसल्याने गृहविलगीकरणाचा पर्याय निवडला. माझ्या शेजारीच सासूबाईंचा फ्लॅट आहे, तिथे मी एका रुममध्ये राहिलो. दोन दिवसांनी आईलाही त्रास जाणवायला लागला. तिची तपासणी केली असता, तोही अहवाल पॉझिटिव्ह आला. तिचे वय पाहता जरा भीती वाटली. परंतु तिलाही सौम्य त्रास असल्याने गृहविलगीकरणाचा पर्याय निवडला. आम्ही दोघे माझ्या सासूबाईंच्या फ्लॅटवर रहायला लागलो.’’

हेही वाचा: ऑक्सिजन बेड उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु : चंद्रकांत पाटील

जोशी म्हणाले, ‘मुलगा, मला आणि आईला खूप धीर द्यायचा. सात-आठ दिवसांनी त्यालाही त्रास झाला. दोन दिवसांनी मला जरा बरे वाटायला लागले होते. माझी पुन्हा तपासणी केली. अहवाल निगेटिव्ह आला. लवकरच आई व मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला.’’

सकारात्मक विचार आणि योग्य पथ्य पाळल्याने आम्ही तिघेही जण कोरोनातून बाहेर आलो. या आजारात मनाचा निर्धार खूप महत्त्वाचा असतो. आपण आजारातून बाहेर पडणारच असे मनाला बजावले पाहिजे.

- गिरीश जोशी