मला आज पांडुरंग पावला; पालकमंत्री निवड झाल्यानंतर गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया

मला आज पांडुरंग पावला; पालकमंत्री निवड झाल्यानंतर गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया
Published on

गिरीष महाजन यांचे छायाचित्र

मला आज पांडुरंग पावला!
पालकमंत्री निवडीनंतर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १७ : आज श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी मतदारसंघातील १५ हजार लोकांसोबत मी पंढरपुरात आलो आहे. विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर मी पालकमंत्री झाल्याची बातमी प्रथम माझ्या पत्नीने मला दिली. आज खरोखर मला आणि माझ्या कुटुंबाला पांडुरंग पावला, अशी भावनिक प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे नवे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज पंढरपुरात दिली.
गिरीश महाजन म्हणाले, ‘‘ऐतिहासिक कुंभमेळ्याच्या कामाला गती मिळेल. यापूर्वी कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. आता पालकमंत्री म्हणून ती आणखी वाढली आहे. नाशिक आणि कुंभमेळ्याला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार.’’
‘‘नाशिक शहरातील ८० टक्के खड्डे बुजवले आहेत. उर्वरित खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. कायमस्वरूपी नाशिकला खड्डेमुक्त करायचे आहे. शहरातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरात साडेचार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री पदासाठी मी कधीही आग्रह केला नाही. तरी मुख्यमंत्री आणि पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली. येणारा कुंभमेळा ऐतिहासिक होणार आहे. या निमित्ताने नाशिकचे रूप बदलायचे आहे. आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासनही गिरीश महाजन यांनी दिले.

ठाकरेंचे मुंबईतील नगरसेवकही तयारीतच
संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. एवढी बडबड करून काही उपयोग नाही. त्यांच्याकडे दोनच खासदार राहिले आहेत. आता मुंबई महापालिकेचे ठाकरे गटाचे नगरसेवकही तयारीतच आहेत, असे सूचक वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. त्यांच्या विधानाने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी राज्यातील एक तरी महापालिका निवडून आणून दाखवावी. एक जिल्हा परिषद आणून दाखवावी. खासदार, आमदार सोडून गेले. त्यांनी कितीही शब्दांची जुमलेबाजी केली तरी आता लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.

एकमेकांबद्दल बोलतानाही संयम पाळावा
मनोज जरांगे यांच्या २९ ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल बोलताना महाजन म्हणाले, ‘‘सामाजिक तेढ निर्माण होईल, असे कोणीही वागू नये. मराठा समाजाच्या ८० टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. टोकाची भूमिका घेऊ नये तसेच एकमेकांबद्दल बोलतानाही संयम पाळावा. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला खूप दिले आहे.’’

जयंत पाटलांवर टिप्पणी
सध्या पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे सर्दी-ताप आला असेल, म्हणून जयंत पाटील हे शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिले असावेत, अशी मिश्कील टिप्पणीही महाजन यांनी केली.

मुंडेंच्या विश्वासार्हतेबद्दल बोलणे अयोग्य
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाला बारा वर्षे झाली आहेत. त्यांनी संघाला व भाजपला मोठे केले. त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलणे योग्य नसल्याचे सांगत महाजन यांनी खंत व्यक्त केली.

Marathi News Esakal
www.esakal.com