सोलापूरने घडवले अन् सन्मानही दिला

सोलापूरने घडवले अन् सन्मानही दिला
Published on

prabhune11 नावाने फोटो सेव्ह आहे.
...........
परिवर्तन घडविण्याची ताकद समाजातच
मानद डी.लिट. स्वीकारल्यानंतर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची ‘सकाळ’ला विशेष मुलाखत
---
अप्पासाहेब हत्ताळे
............
शासन व्यवस्था उभी करू शकते; पण परिवर्तन घडविण्याची ताकद समाजातच असते, असा ठाम विश्वास व्यक्त करणारे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाच्या शिक्षण, पुनर्वसन आणि स्वाभिमानासाठी चार दशकांहून अधिक काळ अविरत कार्य केले. त्या सामाजिक बांधिलकीचा गौरव म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्यांना मानद डी.लिट. प्रदान केला. हा माझा नव्हे; समरस समाजनिर्मितीच्या कार्याचा सन्मान आहे, असे सांगतानाच त्यांनी, मला घडवले ते सोलापूरने, असेही आवर्जून नमूद केले. मानद डी.लिट. स्वीकारल्यानंतर त्यांनी ‘सकाळ’शी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
................
प्रश्न : मानद डी.लिट.चा आपण कसा स्वीकार करता?
उत्तर : विद्यार्थी चळवळीत सक्रिय असल्यामुळे मला पदवीचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यामुळे मानद डी.लिट. मिळणे माझ्यासाठी विशेष मोलाचे आहे. मात्र हा सन्मान माझा नाही; भटके-विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या समरस समाजनिर्मितीच्या कार्याचा हा गौरव आहे, असेच मी मानतो. समाजातील लोकांनी व्यक्त केलेले प्रेम हीच माझी खरी कमाई आहे.
---
प्रश्न : या कार्याची प्रेरणा कुठून मिळाली?
उत्तर : माझी वैचारिक जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत झाली. अभाविपमध्ये काम करताना चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या कार्यातून समाजकार्याची दिशा मिळाली. पुढे भटके-विमुक्त समाजाच्या वास्तवाशी परिचय झाला आणि त्यांच्यासाठी आयुष्य वाहण्याचा निर्णय घेतला. संस्कार संघात मिळाले; पण कामाची दिशा समाजाने दिली.
---
प्रश्न : सोलापूरशी आपले नाते कसे जुळले?
उत्तर : मला घडवले ते सोलापूरने, हे मी मनापासून सांगतो. सोलापूर, धाराशिव आणि परिसरात काम करताना पारधी समाजावर होणारे अन्याय जवळून पाहिले. त्यातूनच माझ्या कार्याला नवी दिशा मिळाली. भटक्या-विमुक्तांच्या मुक्तीचा इतिहासही या भूमीशी जोडलेला आहे.
---
प्रश्न : भटके-विमुक्त समाजात आज कोणता बदल दिसतो?
उत्तर : सर्वांत मोठा बदल म्हणजे आत्मभान आणि स्वाभिमान. आज या समाजातील तरुण शिक्षण घेत आहेत, प्रशासकीय सेवेत जात आहेत, उद्योग-व्यवसाय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करत आहेत. हा बदल आशादायी आहे.
---
प्रश्न : अजून कोणती आव्हाने आहेत?
उत्तर : अनेक कुटुंबांकडे आजही आधार कार्डासारखी मूलभूत कागदपत्रे नाहीत. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. सामाजिक सन्मानाबरोबरच त्यांना शासन व्यवस्थेत पूर्ण हक्क मिळवून देणे ही पुढची लढाई आहे.
---
प्रश्न : समाजपरिवर्तनात सर्वांत महत्त्वाचे काय?
उत्तर : शासन व्यवस्था उभी करते; पण परिवर्तन घडविण्याची ताकद समाजातच असते. समाजाने पुढाकार घेतला, तर शासनालाही योग्य दिशा मिळते. परिवर्तन ही समाजाची सामूहिक प्रक्रिया आहे.
---
प्रश्न : शिक्षण आणि तरुणाईकडून काय अपेक्षा आहेत?
उत्तर : शिक्षण समाजाशी जोडले गेले पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणात अनेक चांगल्या बाबी आहेत; पण मूल्यशिक्षण आणि सामाजिक बांधिलकी अधिक महत्त्वाची आहे. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक परिवर्तनासाठी व्हावा आणि तरुणांनी कुटुंबसंस्कृती व सामाजिक मूल्ये जपावीत.
---
प्रश्न : सोलापूरकरांना आणि देशातील युवकांना काय संदेश द्याल?
उत्तर : सोलापूरला परिवर्तनवादी नेतृत्वाची गरज आहे. समाजातील कोणत्याही घटकावर उपेक्षेची वेळ येऊ नये, ही सामूहिक जबाबदारी आहे. २०४७ चा विकसित भारत घडवायचा असेल, तर शासन, समाज आणि युवा पिढी यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com