पुण्यात भीषण अपघात; हेल्मेट असूनही वाचला नाही 'तिचा' जीव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

चढ-उतार असलेल्या रस्त्यावरुन दुचाकी घसरली. रस्त्यावर पडल्यानंतर क्रेनचे चाक डोक्‍यावरुन गेल्याने तरुणी जागीच ठार झाली. 

पुणे : चढ-उतार असलेल्या रस्त्यावरुन दुचाकी घसरली. रस्त्यावर पडल्यानंतर क्रेनचे चाक डोक्‍यावरुन गेल्याने तरुणी जागीच ठार झाली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता बंडगार्डन रस्त्यावरील फाईव्ह स्टार सोसायटीसमोर घडली. याप्रकरणी क्रेन चालकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दीक्षा नरहरी ओगले (वय 17, रा.गोकुळ कॉलनी, साई पार्क, दिघी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी क्रेनचालक सुभाष पोपट मासाळ (वय 48, रा. भूम, उस्मानाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा दिघी येथील गोकुळ कॉलनीमध्ये राहते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता दीक्षा बंडगार्डन रस्त्यावरील फाईव्ह स्टार सोसायटी समोरच्या रस्त्यावरुन जात होती. हा चढ-उताराचा आहे. त्या रस्त्यावरुनच अन्य वाहनाच्या पुढे जाताना तिच्या दुचाकी घसरली. त्यामुळे दीक्षा रस्त्यावर पडली. त्याचवेळी तेथून क्रेन जात असल्याने व चालकाला तरुणी रस्त्यावर पडल्याचे न दिसल्याने क्रेनच्या डाव्या बाजूचे चाक तिच्या डोक्‍यावरुन गेले.

दीक्षाने डोक्‍यात हेल्मेट घातले होते. परंतु तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दीक्षाचे वडिल सैन्य दलातून सेवानिवृत्त असून तिच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Girl Died in Road Accident in Pune