‘संवादाचा महामेरू’ निःशब्द जाहला!

गीताली वि. मं.
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्याबरोबर दीर्घकाळ काम केलेल्या सहकारी मैत्रिणींनी वाहिलेली आदरांजली...

गेले दीड-दोन महिने ज्या क्षणाची भीती वाटत होती, तो क्षण आज सकाळी अंगावर येऊन कोसळला... पाठीच्या मणक्‍यातून एक जीवघेणी वेदना सणसणून गेली आणि हात-पाय पार गळून गेले. पण... विद्याला माझ्या प्रिय मैत्रिणीला आठवून ताठ बसले आणि पुढच्या कामाला लागले. शो मस्ट गो ऑन... हे आम्हा ‘साऱ्याजणी’चं ब्रीद वाक्‍य! ‘बोले तैसा चाले...’ या उक्तीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणारी आमची मैत्रीण, सहकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या ओजस्वी कार्यकर्तृत्वाला ही ‘आठवां’ची आदरांजली!

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१२ जानेवारी १९३७ ला पुण्यात जन्मलेली सुधा केळकर. शाळेत पहिला नंबर. वक्तृत्व, अभिनय, खेळातही पारंगत. पुढे शिक्षकाशी प्रेमविवाह करून ती विद्या बाळ झाली. आदर्श पत्नी, माता, सून, वहिनीच्या भूमिकेत जगत असताना वयाच्या पस्तिशीपर्यंत सामाजिक जाणीव तिच्यात जागी झाली नव्हती. ती सांगायची, ‘‘मला मिळालेले तीन नकार माझ्या आयुष्याला मोठा अर्थ देणारे ठरले. बॅंकेत नोकरी मिळाली नाही. आकाशवाणीत निर्मातापदासाठी निवड झाली नाही. त्यामुळे त्या चाकोरीत अडकले नाही. १९७४ मध्ये नगरसेवकपदाच्या निवडणुकीत जनसंघपुरस्कृत उमेदवार म्हणून उभी होते, तिथे मी हरले. ‘उजवीकडून डावीकडे’ वळण्याची ही सुरुवात...’’

डॉ. अरुण लिमये या तिच्या मित्राकडे ‘युवक क्रांती दला’त तळागाळातल्या जाती-जमातीतली गरीब मुलं झोकून देऊन सामाजिक कामं करणारी तिनं पाहिली. ‘‘कार्यकर्ता’ होण्यासाठीच पहिलं कृतीचं पाऊल मी अरुणमुळं टाकलं. पण, माझ्यातलं कार्यकर्तेपण घडवलं ते डॉ. नीलम गोऱ्हेनं,’’ असं ती प्रामाणिकपणे सांगत असे. सामाजिक काम आणि स्वातंत्र्यासाठी तिनं पन्नाशीतच गृहत्याग केला. हा तिच्यातला बदल आणि ‘आंतरराष्ट्रीय स्त्री वर्षा’ची घोषणा साधारण एकाच वेळी घडलं. ‘मनाला शंभर डोळे फुटले’ असं तिला वाटू लागलं. 

‘ज्याचं माझ्यावर लेबल लागलं तो ‘मध्यमवर्ग’ मला महत्त्वाचा वाटतो. या वर्गाला दुर्लक्षू नये. या वर्गानं स्वतःत मश्‍गूल न राहता एकूण समाजाचा विचार करायला हवा’, हा विचार ती मांडत असे. आकाशवाणीवरील ‘गृहिणी’ या कार्यक्रमाची ती सादरकर्ती होती. स्पष्ट उच्चार, आवाजातलं आर्जव, निर्झरासारखी वाहती स्वच्छ भाषा, ही तिची वैशिष्ट्यं. १९६४ ते १९८६ पर्यंतचा तिचा संपादन सहायक ते मुख्य संपादक असा ‘स्त्री’ मासिकातला कार्यकाळ. तिचं संपादकत्व बहरत गेलं. ‘स्त्री’ मासिकाच्या संपादकीय ‘संवादा’ला प्रतिसाद देत अनेक जणी स्वतःच्या जीवनातली घुसमट, अडचणी मोकळेपणानं व्यक्त करायच्या. विद्या आपलेपणानं पत्र लिहून दुरून फुंकर घालणारं समुपदेशन करायची. त्यातून कृतीची गरज वाटू लागली. १९८२ च्या सुमारास समविचारी मंडळींना एकत्र करून ‘नारी समता मंच’ची अनौपचारिक वाटचाल सुरू झाली. अत्याचार प्रतिबंधापासून सुरुवात करून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा अशा अनेक प्रश्‍नांवर मंचानं काम केलं. कौटुंबिक हिंसाचार, एकतर्फी आकर्षणातून तरुणींच्या हत्या, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ अशा अनेक मुद्द्यांवर मंचानं काम केलं. एकट्या स्त्रियांना ‘बिचाऱ्या’, ‘अशुभ’, ‘अपशकुनी’ मानले जाई. त्याला विरोध करण्यासाठी १९८९ मध्ये झालेल्या एकट्यांच्या परिषदेला ‘अपराजिता परिषद’ नाव देण्यात विद्याचा पुढाकार होता. स्त्रीमुक्तीवाल्या बायका कुटुंब मोडणाऱ्या हा आक्षेप मोडीत काढत कुटुंबाच्या पुनर्रचनेचा विचार समतेच्या मूल्यावर आधारित करा, असं सांगणारी ‘कुटुंबजीवन परिषद’ तिनं घेतली. मुलग्यांनी त्यांना मिळालेल्या नकाराचा उमदेपणानं स्वीकार करावा म्हणून घेतलेला ‘दोस्ती झिंदाबाद’ मेळावा आयोजिला; ज्यात हजारो मुलांनी हिंसाचार न करण्याची शपथ आमीर खानच्या उपस्थितीत घेतली. किती व काय काय सांगायचं विद्याविषयी?

१९८९ ऑगस्टला तिनं स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं ‘मिळून साऱ्याजणी’ मासिक सुरू केलं. महिलांना आपल्या वेदना, दुःख, स्वप्नं व्यक्त करता यावीत म्हणून हा ‘अवकाश’ माध्यमातला! ती स्त्रियांना लिहितं करू लागली, त्यांचं आत्मभान जागं होऊ लागलं. या मासिकासाठी विद्यानं जिवाचं रान केलं. पायाला भिंगरी, तोंडात साखर आणि डोक्‍यावर बर्फ ही आदर्श कार्यकर्त्याची त्रिसूत्री तिनं अंगीकारली. स्वेच्छा मरणाविषयी विद्यानं खूप वाचन, लेखन केलं. चळवळही सुरू केली. स्वेच्छा मरणाचा विचार हा समृद्ध, स्वावलंबी जगण्याचा विचार आहे, असं ती सांगे. स्वेच्छा मरणासाठी ‘काळ गोळी’ असावी, असं ती मांडत असे. पण, ही ‘काळ गोळी’ नसल्यामुळे विद्याला गेला दीड महिना मृत्यूची प्रतीक्षा करत राहावं लागलं, याचं अतीव दुःख होतंय. समता, स्वातंत्र्य, मैत्रभाव, मानत संविधान वाचवण्यासाठी कणखरपणे उभं राहून सर्वांनी संघर्ष करत राहा, असंच विद्या सारखं कानात सांगतेय, असं वाटत आहे. तुम्हाला ऐकू येतंय..? तिच्या स्मृतीला मनापासून अभिवादन म्हणजे संविधानाचं रक्षण, हे लक्षात ठेवूया.

ब्रॅंड ॲम्बॅसॅडर
 विद्यानं सुरू केलेल्या नारी समता मंच, सखी, साऱ्याजणी, साथ साथ विवाह अभ्यास मंडळ, अक्षरस्पर्श ग्रंथालय, पुरुष उवाच आणि ‘मिळून साऱ्याजणी’ यात दुसऱ्या फळीचे अनेक कर्तबगार, हुशार, कार्यकर्ते आहेत. पण, आम्हा सर्वांची ब्रॅंड ॲम्बॅसॅडर विद्या बाळ! आता होती म्हणावं लागतं, याचं अपार दुःख...

श्रद्धांजली
विद्या बाळ यांच्या निधनाने नारीशक्‍तीचा बुलंद आवाज हरवला असून, स्त्रीवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. अत्याचारग्रस्त महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना त्यांना बोलते करण्याचे काम त्यांनी केले. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

विद्या बाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ साहित्यिक, कृतिशील संपादक, स्त्री हक्‍क चळवळीतील अग्रणी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. स्त्री सक्षमीकरण चळवळीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

इतके विवेकशील नेतृत्व, बुद्धिप्रामाण्य टिकवून, निष्ठेने राहणे आणि स्वत: अभिनिवेश न बाळगता महिला कार्यकर्त्यांना बळ देणे, हे त्यांचे कार्य मौलिक आहे. मध्यमवर्गीय महिलांचे नाते तळागाळातील महिलांशी जोडले, हे त्यांचे सर्वांत मोठे काम आहे. 
- बाबा आढाव,  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

नर्मदा बचाव आंदोलनासह आमच्या प्रत्येक आंदोलनाच्या पाठीशी विद्याताई होत्या. अन्यायाच्या क्षणी त्या आमच्यासोबत असायच्या. त्यामुळे त्यांचा मोठा आधार होता. नैतिकता, माणुसकी जपणारे अतिशय परखड असे व्यक्‍तिमत्त्व होते. 
- सुनीती सु. र.,  सामाजिक कार्यकर्त्या

विद्याताई यांनी ज्या धीराने आयुष्यात अनेक निर्णय घेतले; त्याच धीराने त्या मृत्यूला सामोरे गेल्या. विद्याताईंवर आपण भरभरून प्रेम केले. परंतु, त्यांनी त्यापेक्षाही जास्त आपल्याला भरभरून दिले.  
- साधना दधिच,  संस्थापक सदस्य, नारी समता मंच

‘तुम्ही साऱ्यांनी मला अपार प्रेम दिले आहे...’
आईचा १२ जानेवारीला वाढदिवस होता. परंतु, खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे साधेपणानेच वाढदिवस साजरा केला. आजारी असल्यामुळे तिला जास्त बोलता येत नव्हते. त्यांना रुग्णालयात भेटण्यासाठी गेलेल्या सहकाऱ्याकडून तिने कागद घेतला. त्यावर, ‘‘तुम्ही साऱ्यांनी मला अपार प्रेम दिले आहे. त्यातील कणही इकडेतिकडे सांडला जाणार नाही, याची मी काळजी घेईन!’’ असे लिहिले होते. आईबाबतची ही आठवण सांगताना त्यांची मुलगी डॉ. विनिता यांचे डोळे भरून आले. डॉ. विनिता म्हणाल्या, ‘‘स्वेच्छा मरण घेता यावे, यासाठीही तिने आवाज उठविला. परंतु, हे काम अपूर्ण राहिल्याची खंत तिला होती.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gitali article writes vidya bal