Vidhan Sabha 2019 : मजबूत सरकारसाठी महायुतीला बहुमत द्या : पाटील 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

केंद्राप्रमाणेच राज्यातही मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला विजयी करा.

- चंद्रकांत पाटील, भाजप उमेदवार

पुणे : केंद्राप्रमाणेच राज्यातही मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला विजयी करा. त्याचप्रमाणे विकास हाच माझा अजेंडा असून, कोथरूड आणि पुणे शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असे आवाहन भाजप महायुतीचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले. 

पाटील यांच्या प्रचाराचा समारोप आज रॅलीने झाला. समाजातील सर्व घटकांनी प्रचारादरम्यान मला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. आतला आणि बाहेरचा, या मुद्द्याचा विरोधकांनी कितीही कांगावा केला, तरी सर्वसामान्य जनतेला मात्र भाजपच्या विकासाभिमुख धोरणावर पूर्ण विश्‍वास आहे. त्याचीच प्रचिती या प्रचारादरम्यान आली. राज्य सरकारच्या धोरणांच्या माध्यमातून कोथरूडकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरीने प्रयत्न करीन, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली. 
"ईव्हीएम मशिन' ज्या ठिकाणी ठेवली आहेत, तिथे मोबाईल जामर बसविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी केली आहे. आमची त्याला काहीच हरकत नाही. मात्र, याचा अर्थ स्पष्ट आहे, की कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांनी आपला पराभव मान्य केला असल्याची आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. 

तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून प्रचार सांगता दुचाकी रॅलीला सुरवात झाली. पावसाची रिमझिम सुरू असतानाही कोथरूडकर मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. 

'ही' कोथरूडची संस्कृती नाही 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका केली. मात्र, कोथरूडचा विकास हेच माझे पहिले आणि अंतिम ध्येय आहे. त्यामुळेच विरोधकांनी केलेली टीकाही मी सहन केली. त्याला प्रत्युत्तर दिले नाही.

कोथरूडकरांची आणि पुण्याची संस्कृती मी जाणतो. विरोधकांनी कोणत्याही थराला जाऊन टीका करावी. कोथरूड आणि पुण्याच्या विकासासाठीची कटिबद्धता हेच माझे या टीकेला उत्तर असेल, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: give vote to BJP Shivsena Alliance says Chandrakant Patil