क्रेडिट कार्ड ऍक्टिवेट करण्यासाठी आलेला 'ओटीपी' दिला आणि खात्यातून दिड लाख गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

credit Card

क्रेडिट कार्ड ऍक्टिवेट करण्यासाठी आलेला 'ओटीपी' दिला आणि खात्यातून दिड लाख गायब

किरकटवाडी : नमस्कार मी इंडसलॅंड बॅंकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलतोय. तुमचे क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करायचे आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगा. तुमचे क्रेडिट कार्ड लगेच सुरू होईल," असा फोन झोमॅटोमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून करणाऱ्या किरण दत्तात्रय काळे या तरुणाला आला. किरणने कोणतीही खातरजमा न करता फोनवरून ओटीपी सांगितला आणि काहीच वेळात तब्बल दिड लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च त्याच्या कार्डवरुन करण्यात आल्याचे तीन मेसेज त्याला आले. (Pune News)

मुळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील असलेला किरण दत्तात्रय काळे हा तरुण घरची परिस्थिती बेताची असल्याने कामानिमित्त दोन वर्षांपूर्वी पुण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे खोली भाड्याने घेऊन तो राहत आहे. सध्या तो झोमॅटो या कंपनीमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असून त्यातून त्याला दिवसाला पाचशे ते सातशे रुपये मिळतात.

काही दिवसांपूर्वी किरणने मागणी केलेली नसताना इंडसलॅंड बॅंकेचे क्रेडिट कार्ड त्याच्या घरी आले. क्रेडिट कार्ड विषयी कोणतीही माहिती किरणला नव्हती. कार्ड सुरू कसे करायचे याची माहिती तो गुगलवर सर्च करत असतानाच त्याला फोन आला. तुमचे कार्ड सुरू करायचे असल्याने मोबाईलवरील मेसेजमध्ये आलेला ओटीपी सांगा असे समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने किरणला सांगितले.कोणतीही खातरजमा न करता व जास्त माहिती नसल्याने त्याने लगेच ओटीपी सांगितला.

हेही वाचा: पुण्यातील निर्बंध उठविण्यासाठी धरणे धरायला हवे : अमृता फडणवीस

त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये 50,363, 50,176 व 50,479 असे एकूण 1,51,018 रुपये त्याच्या क्रेडिट कार्डवरुन खर्च झाल्याचे मेसेज आले. किरणने त्याचे कोंढवा येथील एनआयबीएम रोडवरील खाते असलेल्या इंडसलॅंड बॅंकेच्या शाखेत जाऊन याबाबत विचारणा केली परंतु क्रेडिट कार्डचा आणि बॅंकेचा काहीही संबंध नाही असे म्हणत बॅंक अधिकाऱ्यांनी हात वर केले. किरण राहतो ती हद्द शहर आयुक्तालयाच्या सिंहगड पोलीस ठाण्यात येते मात्र तो भाग आमच्या हद्दीत येत नाही असे म्हणत तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनीही किरणची तक्रार घेतली नाही. अखेर किरणने झालेल्या फसवणुकीबाबत शिवाजीनगर येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा: 'देशात पॉर्न पाहण्याचं कारणं सनी लिओनी, तिच्यावर कारवाई का नाही?'

कोणालाही ऑनलाईन किंवा फोनवर क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड नंबर, ओटीपी,पिन नंबर किंवा वित्तीय संस्थांची कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नये. त्याशिवाय गुगल सारख्या सर्च इंजिनवर बँका,वित्तीय संस्थांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या हेल्प डेस्कची माहिती घेऊ नये कारण हॅकर्सनी तशा बोगस लिंक तयार केलेल्या आहेत. तसेच वित्तीय व्यवहार अनोळखी माणसाने पाठवलेल्या लिंक नुसार अजिबात करू नये. बॅंका अशी फोनवरून कधीही माहिती मागवत नाहीत. त्यामुळे सजग असणे आवश्यक आहे.

-दगडू हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम पोलीस स्टेशन, शिवाजीनगर

Web Title: Given The Otp That Came To Activate Card And 15 Lakh Disappeared From The Account

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top