‘ग्लोबल गुरूजी’ निवडीसाठी १३६ शिक्षकांच्या मुलाखती

‘ग्लोबल गुरूजी’ निवडीसाठी 
१३६ शिक्षकांच्या मुलाखती
Published on

पुणे, ता. २४ : जिल्हा परिषदेच्या ‘ग्लोबल गुरुजी’ या आंतरराष्ट्रीय शिक्षक अनुभव उपक्रमाच्या निवड प्रक्रियेतील दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) यांच्या तज्ज्ञ समितीकडून १३६ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्टला ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील ३०३ क्लस्टरमधून निवडलेल्या एक हजार २१२ शिक्षकांपैकी एक हजार २५ शिक्षकांनी १३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. निकालाच्या आधारे पुढील टप्प्यासाठी १३६ शिक्षकांची निवड करण्यात आली होती. तसेच, प्रत्येक तालुक्यातील दोन केंद्रप्रमुखांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. अंतिम निवडीसाठी मुलाखतीतील कामगिरीबरोबरच शिक्षकांची मागील वर्षातील शैक्षणिक व प्रशासकीय कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. शाळेचे अंतर्गत मूल्यमापन, विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिष्यवृत्ती, विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांतील यश, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी नावनोंदणी, गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न, समुदाय सहभाग आणि शिक्षकांना मिळालेले पुरस्कार आदी निकषांचा त्यात समावेश आहे.
या निकषांच्या आधारे अंतिम ४५ शिक्षक, तीन केंद्रप्रमुख, एक विस्ताराधिकारी, एक गटशिक्षणाधिकारी आणि एक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा प्रतिनिधी यांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्यांना सिंगापूर येथील शैक्षणिक अभ्यासदौऱ्याची संधी मिळणार आहे. परतल्यानंतर हे शिक्षक ‘शिक्षणदूत’ म्हणून कार्य करून त्यांचे ज्ञान व नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती इतर शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवतील. ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमातील अंतिम शिक्षकांची घोषणा शिक्षकदिनाच्या निमित्ताने करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com