

अनिल जाधव ः तेलघाणा स्टोरी
‘गोऑनेस्ट’: हायड्राॅलिक तेल घाणा
………….
खाद्यतेलातील वाढत्या भेसळीमुळे ग्राहक शुद्ध तेलाला पसंती देत आहेत. गुणवत्तापूर्ण तेलासाठी ग्राहक जास्त किंमतही मोजायला तयार असतात. ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या तेल उत्पादक उद्योगांची भरभराटही वेगाने होत असते. असाच एक उद्योग म्हणजे पुण्यातील ‘गोऑनेस्ट’. शिल्पा भालेराव आणि अमित भंडारे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे गुणवत्तापूर्ण आणि शुद्ध खाद्यतेल उत्पादन आणि किफायतशीर दरात विक्री करून या वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी वर्षभरात त्यांच्या उद्योगाने उत्पादनाचा यशस्वी टप्पा गाठला आहे.
शिल्पा भालेराव उच्चशिक्षित आणि कार्पोरेट कंपन्यांमध्ये १५ वर्षे नोकरीचा अनुभव. परंतु आई वडिलांच्या आजारपणात सेवा करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. तीन वर्षानंतर एका सेवाभाव संस्थेमध्ये काम सुरू केले. ही संस्था एक्सपेलर तेल निर्मिती करत होती. अमित भंडारेही याच संस्थेत होते. त्यावेळी वेळी अमित आणि शिल्पा यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा विचार केला. शिल्पा यांनी नोकरीतून बाहेर पडत अभ्यासाला सुरुवात केली. तेल निर्मिती व्यवसाय त्यांनी नोकरीमुळे जवळून पाहिला होता. त्यामुळे खाद्यतेल निर्मितीतच उतरायचे त्यांनी ठरवले. त्यांनी बाजारातील खाद्यतेल उत्पादनांचा अभ्यास केला. रिफाईंड, फिल्डर आणि कोल्डप्रेस तेल उत्पादन तंत्र, त्याचे फायदे-तोटे आणि गुंतवणूक यावर सखोल माहिती घेतली. तेव्हा कोल्ड प्रेस तेलाला बाजारात मोठी मागणी असल्याचे लक्षात आले. कोल्ड प्रेस तेलाचे मार्केटही दरवर्षी ७ टक्क्याने वाढत आहे. विशेषतः कोरोनानंतर मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही संधी ओळखत त्यांनी कोल्डप्रेस तेल उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. बाजारात लाकडी घाण्याचा ट्रेंड होता. आपणही लाकडी घाणा तेल उत्पादन सुरू करण्याचा त्यांनी सुरुवातीला विचार केला. पण आणखी खोलात गेल्यानंतर लाकडी घाणा उत्पादनाच्या मर्यादा लक्षात आल्याचे शिल्पा सांगतात. लाकडी घाणे व्यावसायिक गणित बसत नसल्याने बंद होण्याचे प्रमाणही जास्त आहे. लाकडी घाणा पद्धतीने तेल निर्मितीसाठी कामगार जास्त लागतात. वेळ जास्त लागतो. उतारा कमी मिळतो. या सर्व गोष्टींमध्ये उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे साहजिकच किंमत जास्त ठेवावी लागते. याचा विक्रीवर परिणाम होतो. शिवाय अचानक मोठी मागणी आल्यानंतर लगेच उत्पादन वाढवायचे म्हटल्यास लाकडी घाणा पद्धतीत मर्यादा येतात. त्यामुळे किंमत कमी ठेवून गुणवत्तापूर्ण तेल निर्मिती करण्याचा पर्याय आहे का? याची माहिती घेण्यास उद्देश शिल्पा आणि अमित यांनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांना समाज माध्यमांवर हायड्राॅलिक तेल निर्मिती मशिनची माहिती मिळाली. याचे व्यावसायिक गणित, उत्पादन क्षमता, गुणवत्ता आणि उत्पादन खर्च या सर्व बाबींवर त्यांनी अभ्यास केला. हायड्राॅलिक मशिनची माहिती घेतली. मशिनचे उत्पादक आणि वितरक, किमतीची माहिती घेऊन त्यांनी हायड्राॅलिक मिशनद्वारे तेल निर्मिती उद्योग उभा करण्याचा निर्णय घेतला.
हायड्राॅलिक पद्धतीच का?
लाकडी घाण्याऐवजी हायड्राॅलिक मशिनच का निवडले? असे विचारले असता शिल्पा सांगतात की, १०० टक्के नैसर्गिक आणि शुद्ध तेल निर्मितीचा आमचा उद्देश होता. लाकडी घाणा पद्धतीने तेल निर्मिती करताना तापमान वाढतेच. त्यापेक्षा अधिक तापमान एक्सपेलर पध्दतीने वाढते. हायड्राॅलिक पध्दतीने तापमान वाढत नाही. त्यामुळे तेलाची चव बदलत नाही. हाड्रोलिक मशिन हे तेल निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान आहे. यात तेलबिया सुकवल्या जातात. तेलबियांमधील ओलावा ५ टक्क्यांच्या आत आल्यानंतर त्यापासून तेल निर्मिती केली जाते. तेलबिया मशिनमध्ये टाकल्यानंतर अतिदाब देऊन तेल काढले जाते. लाकडी घाणा पद्धतीप्रमाणे तेलबिया भरडल्या जात नाहीत. त्यामुळे तेलासोबत गाळ येत नाही. लाकडी घाण्यात तेलबिया भरडल्या जातात. त्यामुळे सालीचा कडवटपणा तेलात उतरतो. हायड्राॅलिक पध्दतीमध्ये असे होत नाही. म्हणजेच हायड्राॅलिक पध्दतीने भरडावे लागत नाही, तेलबियामध्ये ओलावा नसतो आणि सालीचा कडवटपणा येत नाही. त्यामुळे तेलाची चव १०० टक्के नैसर्गिक येते. लाकडी घाण्यामध्ये तेलाचा उतारा ३५ ते ४० टक्के मिळतो. तेच हायड्राॅलिक पध्दतीने ४३ टक्के उतारा मिळतो. म्हणजेच किलोमागे तेल मिळण्याचे प्रमाण वाढते. त्यात पाणी किंवा इतर कुठले मिश्रण टाकण्याची गरज पडत नाही. तेलाचा सुगंध कायम राहतो. तेलामधील पोषणतत्त्वे कमी होत नाहीत. मागणी येईल त्या प्रमाणात कमी मजुरांमध्ये उत्पादन वाढवणेही शक्य होते. हायड्रोलिक पद्धतीने २० किलो शेंगदाण्यातून ४५ मिनिटात तेल काढता येते. लाकडी घाण्यातून तेल काढण्यासाठी जास्त वेळ लागतो. महत्त्वाचे म्हणजे तेल निर्मितीत कुठेही मानवी हस्तक्षेप करावा लागतो नाही. मजूर फक्त तेलबिया मशीनमध्ये टाकणे आणि बटण दाबणे एवढेच काम करतात. त्यामुळे मजूरही कमी लागतात. एक मजूर दोन मशीन चालवू शकतो. स्वच्छतेचे पूर्ण निकष पाळणे शक्य होते. यामुळे हायड्राॅलिक मिशनद्वारे तेल निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे शिल्पा सांगतात. कमी मनुष्यबळावर त्यांचे उत्पादनाचे काम चालते.
प्रकल्पाची उभारणी ः
केवळ नफ्यामागे न पळता गुणवत्तापूर्ण आणि शुद्ध तेलाचे प्रामाणिकपणे उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवून त्यांनी ‘गोऑनेस्ट’ ब्रॅंड तयार केला. हायड्राॅलिक हे नवे तंत्रज्ञान. त्यामुळे गुंतवणूकही करावी लागत होती. त्यांनी आतापर्यंत प्रकल्पात ३५ लाखांची गुंतवणूक केली आहे. त्यापैकी शिल्पा आणि अमित यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये असे १० लाख रुपये गुंतवले आहेत. तर २५ लाख रुपयांचे बॅंक कर्ज घेतले आहे. दोन हायड्राॅलिक मशिन्सची खरेदी केली आहे. पॅकिंगसाठी वॅड मिशन आहे. बाॅटल फिलिंग मिशनही घेतले आहे. त्यामुळे पॅकिंग करताना मानवी हस्तक्षेप करावा लागत नाही. नारळ स्लाइसर मशिन घेतले आहे. नारळचे स्लाईस केल्याशिवाय तेल निघत नाही. त्यामुळे महिन्याला ३५०० हजार लिटर तेल निर्मितीची क्षमता तयार झाली आहे. प्रिंटिंग मशिनही घेतले आहे. मागील आठ महिन्यातच त्यांनी ३५ लाखांच्या तेलाची विक्री केली आहे. तेलाची शुध्दता आणि पोषणतत्त्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी फिल्टर मशिनचीही खरेदी केली आहे. गुणवत्तापूर्ण तेल निर्मितीवर भर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. तेलाची गुणवत्ता तपासणे आणि वाढविण्यासाठी फूड लॅबची निर्मिती केली आहे. सिद्धिका मोरे ही फूड लॅबचे काम पाहते. तेल निर्मिती झाल्यानंतर प्रत्येक बॅचमधील सॅम्पलची तपासणी केली जाते. गुणवत्ता कमी असल्यास तेल खाण्यासाठी न देता ते इतर वापरासाठी कमी भावात दिले जाते.
विक्रीची व्यवस्था ः
कोल्ड प्रेस तेल उत्पादनाचा खर्च जास्त आहे. त्यात रिफाइंड तेलाप्रमाणे विक्री व्यवस्था निर्माण करायची म्हटल्यास खर्च आणखी वाढतो. हा खर्च वाढला तर विक्रीची किंमत वाढवावी लागेल. त्यामुळे ग्राहकांना तेल परवडणार नाही. त्यामुळे कोल्ड प्रेस तेलाची विक्री थेट ग्राहकांना करणेच परवडते. शिल्पा आणि अमित यांनी ‘गोऑनेस्ट’ नावाने ब्रॅंड तयार करून थेट ग्राहकांना विक्री सुरू केली. सुरुवातीला संपर्कातील ग्राहकांना विक्री केली. उत्पादनाच्या गुणवत्तेमुळे थेट खरेदी करणारे ग्राहक वाढत गेले. सध्या नारळ तेलाची विक्री ७८० रुपये प्रतिलिटरने केली जाते. शेंगदाणा तेल ऑनलाइन ३७० रुपये लिटरने केला जाते. करडई तेल ४४० रुपये आणि मोहरी तेल ३८० रुपये प्रति लिटरने ग्राहकांना ऑनलाईने विकले जाते. तसेच सूर्यफूल तेल ३९५ रुपये आणि तिळाचे तेल ४४० रुपये प्रतिलिटरने ग्राहकांना विकले जाते. थेट ग्राहकांसोबतच किरकोळ विक्रेत्यांना तेलाचा पुरवठा केला जातो. मागणीनुसार पॅकिंगमध्ये विक्रेत्यांना तेल दिले जाते. त्यानंतर विक्रेते आपल्या ब्रॅंडच्या नावाखाली तेलाची विक्री करतात. थेट ग्राहकांना विक्रीपेक्षा अशा विक्रेत्यांना तेल जाण्याचे प्रमाण जास्त आहे, असे शिल्पा यांनी सांगितले. शिल्पा यांच्याकडून तेल घेणारे विक्रेतेही तेलाची विक्री ऑनलाइनच जास्त करतात. ग्राहकांना एकदा तेलाची गुणवत्ता आवडली तर ऑनलाइन त्या ब्रॅण्डची खरेदी करत राहतात. आतापर्यंत शिल्पा आणि अमित यांनी मार्केटिंगपेक्षा गुणवत्तापूर्ण तेल उत्पादनावरच जास्त भर दिला आहे. आता उत्पादनाची साखळी बसली आहे. आता थेट विक्रीसाठी मार्केटिंगवर भर देण्याचे ठरवले आहे. ऑनलाइन विक्रीसाठी वेबसाइटसह समाज माध्यमांचा वापर केला जात आहे. आजही त्यांची उत्पादने भारतभर मागणीनुसार जातात. अमेझाॅनवरून आसाम आणि कर्नाटकमध्ये तेलाची विक्री केली आहे. त्यांनी आता सर्व प्लॅटफाॅर्मवरून मार्केटींग आणि विक्रीचा निर्णय घेतला आहे.
तेलबियांची खरेदी ः
तेल निर्मितीसाठी आवश्यक तेलबियांची खरेदी वेगवेगळ्या मार्केटमधून गरजेनुसार केली जाते. शेंगदाणा खरेदी सोलापूर आणि गुजरातमधून केली जाते. तिळाची खरेदी मध्य प्रदेश आणि गुजरातमधून होते. तर मोहरीची खरेदी राजस्थानमधून केली जाते. तमिळनाडूमधील खोबऱ्याची खरेदी होते. या बाजारांमधील व्यापाऱ्यांकडून गरजेनुसार माल मागवला जातो. पुढील काळात उत्पादन वाढल्यानंतर हंगामात खरेदी करून स्टाॅक करण्याचे नियोजन आहे. तेलबियांमधून तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पेंडेची विक्री करत आहेत. हायड्राॅलिक पध्दतीमध्ये तेलबिया भरडल्या जात नाहीत. त्यामुळे पेंडेची गुणवत्ताही चांगली असते. पशुधन आहारासाठी या पेंडेला चांगली मागणी असते. शेंगदाणा, तीळ, सूर्यफुल, नारळ आणि करडई पेंडची निर्मिती होते. पुढील काळात तेलाचे उत्पादन वाढल्यानंतर पेंडेची निर्मितीही वाढणार आहे. भविष्यात थेट पशुपालक शेतकऱ्यांना किफायतशीर दरात पेंड देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी पशुपालकांसोबत पुरवठ्यासाठी ते काम करणार आहे.
...........
फोटो
१. ‘गोऑनेस्ट’चे प्रवर्तक शिल्पा भालेराव आणि अमित भंडारे PNE26W57179
२. तेलबियांमधील ओलावा कमी करण्यासाठीचा ट्रे PNE26W57180
३. हायड्राॅलिक तेल निर्मिती मशिन PNE26W57181
४. बाॅटलमध्ये तेल भरण्याचे मशिन PNE26W57182
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.