सोशल मीडियावर भावनिक माहिती देणारे लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 October 2018

पुणे - फेसबुक व इतर सोशल मीडियावर स्वतःबद्दल जास्तीत जास्त माहिती देणे, सतत भावनिक पोस्ट टाकणे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी सहजपणे मैत्री करणारे लोक सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य बनतात, असे मत सायबर गुन्हे व सायबर सुरक्षातज्ज्ञ ॲड. वैशाली भागवत यांनी व्यक्त केले.

पुणे - फेसबुक व इतर सोशल मीडियावर स्वतःबद्दल जास्तीत जास्त माहिती देणे, सतत भावनिक पोस्ट टाकणे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी सहजपणे मैत्री करणारे लोक सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य बनतात, असे मत सायबर गुन्हे व सायबर सुरक्षातज्ज्ञ ॲड. वैशाली भागवत यांनी व्यक्त केले.

सोशल मीडिया, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा आणि युवक व मानसिक आरोग्य; समस्या आणि आव्हाने या विषयावर कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत त्या बोलत होत्या. कर्वे समाज सेवा संस्था, रोटरी क्‍लब ऑफ पूना वेस्ट, मनोदय मेंटल हेल्थ फोरम आणि पुणे पोलीस सायबर गुन्हे सुरक्षा विभागाने ही परिषद आयोजित केली होती. परिषदेत मनोविकारतज्ज्ञ डॉ. सुप्रकाश चौधरी, डॉ. वासुदेव परळीकर, पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद शाळिग्राम, लेखक अतुल कहाते, पुणे सायबर क्राईम विभागातील पोलिस उपनिरीक्षक अलका जाधव, चित्रपट दिग्दर्शक गिरीश जोशी, ‘सकाळ’चे वृत्तसंपादक माधव गोखले, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्‍निकल एज्युकेशनचे सदस्य डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. शैलेश पालेकर, डॉ. महेश ठाकूर आदी सहभागी झाले होते. 

सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे मानसिक आजाराची शिकार होणाऱ्या लोकांचे प्रमाण मोठे असल्याचे कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर यांनी सांगितले.

वर्षभरात आठ हजार तक्रारी
पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडे वर्षभरात जवळपास आठ हजार तक्रारी आल्या असून, यातील अनेक प्रकरणांमधील गुन्हेगार पकडले गेल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अलका जाधव यांनी दिली. ऑनलाइन फसवणूक किंवा अन्य सायबर गुन्ह्यांसंबधी तक्रार असल्यास सायबर क्राईम विभागाशी नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी  केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goals that give emotional information to social media