दुग्धोत्पादनासाठी देशी गोवंश संशोधनावर भर द्या

‘गोधन -२०२२’ : पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांची प्रदर्शनाला भेट; विद्यापीठांना सूचना
Animal Exhibition
Animal ExhibitionSakal

पुणे - ‘‘राज्यातील कास्तकारांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्याची क्षमता देशी गोवंशात आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक दुग्धोत्पादन वाढविणाऱ्या देशी गायींच्या जातींच्या संशोधनावर भर द्यावा,’’ अशी सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केली.

‘सकाळ-अॅग्रोवन’ व महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘गोधन -२०२२’ प्रदर्शन व प्रात्यक्षिकांना केदार यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धीरज कंखरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. धनंजय परकाळे, सहआयुक्त विमलकुमार मुकणे उपस्थित होते.

केदार म्हणाले, की ज्यातील शेतकऱ्यांना रोज १२-१३ लिटरपर्यंत दूध उपलब्ध करून देणाऱ्या देशी गायींच्या जाती मिळायला हव्यात. त्यातून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाला आर्थिक हातभार लागू शकतो. त्यासाठा विद्यापीठाने भरपूर दूध देणाऱ्या अशा देशी दुधाळ गायींच्या जाती निवड किंवा संकर पद्धतीतून तयार करायला हव्यात. अर्थात, विद्यापीठांनी फक्त गोवंशाच्या संशोधनावर भर द्यावे. या संशोधनाचा विस्तार करण्याची जबाबदारी शासकीय खात्यांची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदर्शनातील दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती विभागाला भेट दिल्यानंतर केदार यांनी समाधान व्यक्त केले. “दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती शेतकरी त्यांच्या पातळीवर कमी खर्चात कशी करू शकेल, या बाबत विद्यापीठाने संशोधन करायला हवे, असे ते म्हणाले. देशी शेळीपालनही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त जोडधंदा असल्याचे पशुसंवर्धनमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले. शेळी संशोधन वाढवून ४० ते ५० किलोपर्यंत वजनाचे बोकड तसेच दुधाळ शेळ्यांच्या जाती शेतकऱ्यांच्या हाती दिल्यास छोट्या शेतकऱ्यांना आधार मिळू शकतो. कृषी विद्यापीठाला आमच्या खात्याची कोणतीही मदत लागल्यास जरूर सांगावी, असे केदार यांनी कुलगुरू डॉ. पाटील यांना सांगितले.

प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

पुणे : वाकडेवाडी (शिवाजीनगर) येथील कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारपासून सुरू झालेल्या ‘गोधन’ प्रदर्शनाचा रविवारी (ता.२९) शेवटचा दिवस आहे. मोफत प्रवेश असलेल्या या प्रदर्शनात गोवंश, गोपालनाची माहिती व प्रात्यक्षिके असून साहिवाल, थारपारकर, लाल सिंधी, राठी, गीर तसेच खिलार, देवणी, लालकंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला असे गोवंश बघण्याची संधी आहे. पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये ‘सकाळ अॅग्रोवन’ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनास आज पुणे, नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसह राज्यभरातील पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मंत्र्यांची गोपरिक्रमा

गोधन प्रदर्शनात केदार यांनी गोपरिक्रमादेखील केली. अडीच फुटाच्या पंगानूर जातीच्या सर्वात छोट्या गायीभोवती ते रेंगाळले. अडीच-तीन लाख रुपये मोजूनदेखील या गायी लवकर विकत मिळत नाहीत, असे शास्त्रज्ञांनी केदार यांना सांगताच असे वाण म्हणजे पुरातन वस्तूंसारखाच दुर्मिळ ठेवा असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com