

‘गोकुळ’विरुद्ध शेतकऱ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
जुन्या ऊसबिलांची मागणी; दक्षिणच्या तहसीलदारांचा मध्यस्थीचा प्रयत्न
उ. सोलापूर, ता. ३१ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांतील शेकडो शेतकऱ्यांची २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील ऊस बिले थकली आहेत. या बिलांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ३१) दक्षिणचे तहसीलदार रावसाहेब जमदाडे यांची भेट घेतली. बिले तातडीने न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तहसीलदार जमदाडे यांनी जुनी बिले लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी आंदोलन नेते ॲड. अमोल पाटील, अरविंद घोडके आदी उपस्थित होते.
दरम्यान, गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी कारखाना विक्रीवेळी जुन्या बिलांची माहिती ओंकार शुगर्सचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांना दिली नव्हती. त्यामुळे जुनी बिले देण्यात आलेली नाहीत. तहसीलदार जमदाडे यांनी बोत्रे-पाटील यांना ‘गोकुळ’कडील जुन्या बिलांची माहिती दिली असून, त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच बिले मिळण्याची शक्यता आहे.
चौकट
कुणाच्या खात्यावरून बिले द्यायची?
गोकुळ साखर कारखाना ओंकार शुगर्सकडे वर्ग करण्यात येत आहे. मात्र, काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जुनी बिले कुणाच्या खात्यावरून द्यायची, असा पेच निर्माण झाला आहे.
कोट :
“गोकुळ कारखान्याकडील शेतकऱ्यांची जुनी बिले मिळावीत, या मागणीसाठी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार जमदाडे यांची भेट घेतली. त्यांनी गोकुळचे चेअरमन शिंदे, ओंकार शुगर्सचे चेअरमन बोत्रे-पाटील आणि प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्याशी भ्रमनध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.”
- ॲड. अमोल पाटील, शेतकरी आंदोलन नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.