esakal | बारामतीच्या पोलिस उपमुख्यालयासाठी 300 पदे भरण्यास शासनाची मंजूरी
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

बारामतीच्या पोलिस उपमुख्यालयासाठी 300 पदे भरण्यास मंजूरी

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : तालुक्यातील ब-हाणपूर येथील प्रस्तावित पोलिस उपमुख्यालयासाठी 287 नियमित पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या शिवाय 13 पदे बाह्ययंत्रणेमार्फत घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

पुणे पोलिस मुख्यालयावरील ताण कमी करण्यासाठी व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व दौंड या सारख्या तालुक्यात तातडीच्या प्रसंगी वेगाने पोलिस बंदोबस्त उपलब्ध व्हावा या साठी बारामती तालुक्यातील ब-हाणपूर येथे पोलिस उपमुख्यालयाची निर्मिती करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली होती.

हेही वाचा: फडणवीस केंद्रात, ठाकरे मुख्यमंत्री; शिवसेना-भाजपची पुन्हा युती?

पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पोलिस बंदोबस्त तातडीने उपलब्ध व्हावा व कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी असाही या मागचा उद्देश होता. या उपमुख्यालयाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी तीनशे पदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांनी दिला होता.

मुख्य सचिवांच्या बैठकीत हा प्रस्ताव नुकताच सादर केला गेला. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून 287 नियमित पदे तर 13 पदे बाह्य यंत्रणेमार्फत आवश्यकतेनुसार निर्माण करण्यास वित्त विभागानेही मान्यता दिल्यानंतर आता या बाबतची पुढील कार्यवाही सुरु होणार आहे.

हेही वाचा: का करावा 'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम'?

दरम्यान या पोलिस उपमुख्यालयाच्या कामाने आता गती घेतली असून वेगाने हे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे. बारामतीत पोलिस उपमुख्यालय निर्माण झाल्यानंतर विविध कार्यक्रम, मोर्चा, आंदोलन तसेच राजकीय सभा व इतर बाबींसाठी लागणारा बंदोबस्त तातडीने मिळू शकेल. दक्षिण पुणे जिल्ह्यासाठी या उपमुख्यालयातून बंदोबस्त पाठविला जाणार असून या मुळे इंधन, वेळ, पैसा यांची बचत होणार आहे.

loading image