esakal | सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाचे दोन डोस बंधनकारक
sakal

बोलून बातमी शोधा

लसींचे डोस

सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाचे दोन डोस बंधनकारक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत सहभागी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी दोन डोस घ्यावेत, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे.

सरकारी व निमसरकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचे दोन डोस घेतले नसल्याचे कोविन पोर्टलच्या माध्यमातून उघड झाले आहे. यापैकी पंचवीस हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी तर अद्याप कोरोना प्रतिबंधासाठीचा एकही डोस घेतला नसल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: वैद्यकीय क्षेत्रात 5000 पदांसाठी बंपर भरती

त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत नऊ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही पंचवीस हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत एकही डोस घेतला नसल्याचे आणि सुमारे सव्वा लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे उघडकीस आले आहे.

या आदेशानुसार सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि फ्रंटलाईन वर्कर्सनी दोन डोस घेणे अनिवार्य केले आहे. शिवाय या लसीकऱणाची नोंद कोवीन या पोर्टलवर नोंदवून, त्याबाबतचे प्रमाणपत्र घेण्याचे बंधनकारक केले आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पदव्युत्तर परीक्षा पुढे

प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबरची डेडलाईन

जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दोन डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीच्या आता जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील कर्मचारी लसीकरण सद्यःस्थिती

  • लसीकरणासाठी पात्र आरोग्य कर्मचारी --- १ लाख ६९हजार ३१९

  • पहिला डोस घेतलेले --- १ लाख ६२ १७

  • दोन डोस पूर्ण झालेले --- १ लाख २७ हजार ४

  • लसीकरणासाठी पात्र फ्रंटलाइन वर्कर --- २ लाख ८४ हजार ३७७

  • एक डोस झालेले --- २ लाख ५८ हजार ७७३

  • दोन डोस घेतलेले --- १ लाख ९२ हजार ५६८

  • दोन्ही संवर्ग मिळून पहिला डोस बाकी --- २६ हजार ९०६

  • दोन्ही मिळून दुसरा डोस बाकी --- १ लाख २८ हजार १२४

loading image
go to top