
पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील ग्रामपंचायतीच्या काळातील जुन्या बांधकामांना व सदनिकांना न्याय देण्याचे काम आपले सरकार करेल.
महापालिका समाविष्ट गावातील जुन्या बांधकामांना व सदनिकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल
खेड-शिवापूर - महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील ग्रामपंचायतीच्या काळातील जुन्या बांधकामांना व सदनिकांना न्याय देण्याचे काम आपले सरकार करेल. त्यासंबंधीच्या सूचना महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांना देण्यात येतील,' असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.
सातारा दौऱ्यावर असताना गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी स्वागत केले. यावेळी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील जुनी बांधकामे वाचली पाहिजेत, या मागणीचे निवेदन कोंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. यावेळी ते बोलत होते. खेड-शिवापूरचे सरपंच अमोल कोंडे, राणी भोसले, निलेश गिरमे, दत्ता रायकर, आण्णा दिघे, उमेश दिघे, राजाभाऊ सणस, दशरथ खिरीड आदी यावेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, 'आपले सरकार हे सर्वसामान्य नागरीकांचे सरकार आहे. त्यामुळे आपल्या सरकारकडून सर्वसामान्य माणसावर अन्याय होणार नाही. मराठा आरक्षणाबाबतही लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल.'