विचारधारेवरून मतभेद नकोत - राज्यपाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

समाज युगानुयुगे टिकण्यासाठी आणि तो एक करण्यासाठी साहित्यिक, कलाकार योगदान देऊ शकतात. त्यांचे हे योगदान देश आणि जगासाठी उपयुक्त ठरू शकते. या विचारमंथनातून काहीतरी नवीन पुढे येईल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

पुणे - ‘‘भारतात स्वतःला उदारमतवादी, नागरी समाज आणि पुरोगामी म्हणून घेणारे अनेक आहेत. या वेगवेगळ्या विचारधारांमुळे समाजात मतभेद दिसतात, ते टाळण्यासाठी विविध विचारधारा असणाऱ्या सर्व गटांनी समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे. चर्चेतून कोणत्याही समस्येवर मार्ग निघू शकेल. त्यामुळे समाजातील विविध विचारधारा असलेल्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करावी,’’ असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समाज युगानुयुगे टिकण्यासाठी आणि तो एक करण्यासाठी साहित्यिक, कलाकार योगदान देऊ शकतात. त्यांचे हे योगदान देश आणि जगासाठी उपयुक्त ठरू शकते. या विचारमंथनातून काहीतरी नवीन पुढे येईल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. दकनी अदब फाउंडेशनच्या वतीने पुण्यात तीनदिवसीय ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन कोशियारी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी खासदार डॉ. सत्यपालसिंग, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, साखर आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर आदी उपस्थित होते. 

सध्या समाजात लिटरेचर फेस्टिव्हल होत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. साहित्य, संस्कृती, कला यांचा चांगला मिलाफ या फेस्टिव्हलमध्ये आहे. येथे जे मंथन होईल ते समाजाला पुढे घेऊन जाईल, अशी अपेक्षा दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी या वेळी व्यक्त केली. मोनिका सिंग यांनी प्रास्ताविक केले. या वेळी राज्यपालांच्या हस्ते मोनिका सिंग यांच्या गझलांच्या संग्रहाचे प्रकाशन झाले. राजीव श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन केले.

दरम्यान, उद्‌घाटनानंतर भारद्वाज यांच्या उपस्थितीत ‘व्यावसायिक चित्रपटातील कल्पकता’ या विषयावर परिसंवाद झाला. आरती अंकलीकर यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 

साहित्याने जोडण्याचे काम करावे : डॉ. सिंग 
वेद हे जगातले पहिले काव्य होते. काव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नव्या पिढीसमोर चांगले साहित्य येत नाही. जीवन समृद्ध करण्यासाठी आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी साहित्याची गरज आहे. त्यामुळे साहित्याने सर्वांना जोडण्याचे काम करावे, असे मत खासदार आणि पुण्याचे माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंग यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor appealed that people of different ideologies should be discussed

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: