राज्यपालांना कोरोनाचा विसर?, सत्कारावेळी स्पर्धकाचा स्वत: काढला मास्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांना कोरोनाचा विसर?, सत्कारावेळी स्पर्धकाचा स्वत: काढला मास्क

राज्यपालांना कोरोनाचा विसर?, सत्कारावेळी स्पर्धकाचा स्वत: काढला मास्क

- अश्विनी जाधव केदारी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड येथे 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी कार्यक्रमात स्पर्धकांचा सत्कार करताना राज्यपाल कोश्यारी यांना कोरोना निर्बंधाचा विसर पडल्याचं दिसलं. एकीकडे सरकार मास्क लावा, म्हणून सांगत असताना एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात कोश्यारी यांनी स्वत: स्पर्धकाचा मास्क काढला. यामुळे पुणेकरांमध्ये चर्चा रंगली होती.

शुक्रवारी सकाळी कोथरूडमध्ये सायकल रॅलीच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सहभागी झाले होते. राज्यपालांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रॅलीत सहभागी होणाऱ्या निरुपमा भावे या सायकलपटूचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते झाला. त्यावेळी फोटो काढताना राज्यपालांनी चक्क भावे यांचा मास्क स्वतःच्या हाताने काढला, त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली. वास्तविक कोरोना संकटात सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आहेत. सहभागी होणाऱ्या लोकांच्या संख्येवर मर्यादा आहेत. त्यातही कोविडच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तोंडावर मास्क लावणे हा कोविड काळातील मूलभूत नियम झालाय. अशावेळी राज्यपालांनी एखाद्या नागरिकाचा मास्क स्वतःच्या हाताने काढणे ही कृती कितपत योग्य आहे अशी चर्चा पुणेकरांमध्ये रंगली आहे.

हेही वाचा: अंगठ्याची ही साधी टेस्ट ओळखू शकते हृदयविकाराचा संभाव्य धोका

सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपाध्यक्षा प्राध्यापक मेधा कुलकर्णी, नगरसेवक जयंत भावे आणि सायकलपटू उपस्थितीत होते. सायकल रॅलीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देश विदेशातील नागरिकांनी प्रतिसाद देत योग दिवस साजरा केला. सायकलचा दैनंदिन जीवनात वापर निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरण्यासोबत पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लागतो.

टॅग्स :Coronavirus