

पदवीधर मतदारसंघाच्या
निवडणूकीसाठी उद्या मतदान
तब्बल ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात
छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी येत्या शुक्रवारी (ता.२३) मतदान होणार आहे. शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदानाची संधी असेल. तब्बल ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान पद्धती आणि आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या अन्य सार्वत्रिक निवडणुकांतील मतदानाची पद्धती यात मूलभूत फरक आहे. विधानपरिषद निवडणुकीचे मतदान हे मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवून घेण्यात येते.
जितके उमेदवार निवडणूक लढवीत असतील अशा सर्वांपुढे पसंतीक्रम नोंदविता येतो. मतदानाच्या या वेगळ्या पद्धतीमुळे मतदारांनी आणि विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्यांनी ही पद्धत जाणून योग्यरितीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केले आहे.
.....
असे करा मतदान
मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेबरोबर पुरवलेले जांभळ्या (व्हायलेट) रंगाचे स्केच पेनच वापरावे. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन मतदानासाठी वापरु नये, असे मतपत्रिका अवैध ठरेल. उमेदवाराच्या नावाच्या स्तंभासमोर पसंतीक्रम म्हणून असलेल्या स्तंभामध्ये तुम्ही प्रथम पसंतीचा उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर १ असा आकडा लिहून मतदान करावे.१ हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्यावा. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील तेवढे पसंतीक्रम देता येतील. कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर आपण फक्त एकच आकडा टाकलेला आहे याची खात्री करावी. तसेच तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर टाकलेला नाही याची देखील खात्री करावी. पसंतीक्रम फक्त १, २, ३ इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवावा. एक, दोन, तीन इत्यादी शब्दांमध्ये दर्शवू नये. पसंतीक्रमाचे आकडे भारतीय अंकाच्या १, २, ३ इत्यादींसारख्या आंतरराष्ट्रीय रूपात किंवा I, II, III इत्यादींसारख्या रोमन रूपात किंवा १, २, ३ अशा देवनागरी रूपात किंवा संविधानाच्या आठव्या अनुसूचीमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रूपामध्ये चिन्हांकित करता येतील.मतपत्रिकेवर मतदाराने आपले नाव, आद्याक्षरे किंवा अन्य शब्द लिहू नयेत किंवा स्वाक्षरी करू नये. तसेच आपल्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नये. असे केल्यास आपली मतपत्रिका अवैध ठरेल. पसंतीक्रम दर्शविण्यासाठी तुमच्या निवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर किंवा X अशी खूण करणे टाळावे. अशा मतपत्रिका बाद करण्यात येतील. मतपत्रिका वैध ठरण्यासाठी एकूण उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर १ हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शवणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहेत. म्हणजेच इच्छेनुसार दुसरी किंवा पुढील पसंती दर्शवावी.
....
अशा मतपत्रिका अवैध ठरतील
-१ हा आकडा टाकलेला नसल्यास.
-१ हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर टाकलेला असल्यास.
-१ हा आकडा, तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी टाकलेला आहे याबाबत शंका निर्माण होईल अशाप्रकारे टाकलेला असेल.
-एकाच उमेदवाराच्या नावासमोर १ आणि त्याबरोबर २, ३ इत्यादी आकडे देखील टाकलेले असतील.
-पसंतीक्रम आकड्याऐवजी शब्दांमध्ये दर्शवलेला असेल.
-मतदाराची ओळख पटू शकेल अशी कोणतीही खूण किंवा लेखन असले,
- असे आकडे टाकण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने कोणताही आकडा टाकलेला असेल.