आमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर...; मनसेच्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून उमेदवार निवडून देण्यास राज्यात सुरवात झालाी असून सर्व राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहे. उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली असून विविध जिल्ह्यातील पदवीधरांच्या भेटीगाठी घेत आहे.  पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकीत महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा रुपाली पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी नुकताच सातारा जिल्हा दौरा पुर्ण केला. 

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना शनिवारी दुपारी जिवे मारण्याच्या धमकीचा दूरध्वनी आला. या बाबत पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार संबंधित व्यक्तrविरुद्ध पोलिस कारवाईस प्रारंभ झाला आहे. तसेच पाटील यांनी पोलिस संरक्षण मिळावे, म्हणूनही पोलिसांना कळविले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे पदवीधर मतदारसंघात प्रचार करीत असताना रुपाली पाटील यांच्या मोबाईलवर दूरध्वनी आला. त्यावेळी बोलणाऱ्या व्यक्तिने पाटील यांचा एकेरी उल्लेख केला. आमदार व्हायचे स्वप्न बघू नका, असेल तेथे येऊन संपवून टाकेल, अशा आशयाची धमकी दिली. तसेच साताऱ्यातून दाभाडे पोलत आहे, असे सांगत आक्षेपार्ह वक्‍तव्येही केली. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजून 25 मिनिटांनी घडली. धमकीचा फोन येताच पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित आरोपीचा शोध घेवून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पाटील यांच्या दूरध्वनीमध्ये हा कॉल रेकॉर्ड झाला असून त्याची कॉपी, संबंधित मोबाईल क्रमांक त्यांनी पोलिसांकडे सुपूर्त केला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्यामुळे पोलिस संरक्षणही मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनीही या बाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

पाटील यांचे पती ऍड. विजयसिंह ठोंबरे म्हणाले, ""पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रुपाली पाटील यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाचही जिल्ह्यांत प्रचाराच्या दोन फेऱ्या झाल्या असून अनेक ठिकाणी मतदारांनी पक्ष बाजूला ठेवून युवा उमेदवार म्हणून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. काही समाजविघटक घटकांना हा प्रतिसाद सहन झालेला नाही. त्यामुळेच त्यांनी रुपाली पाटील यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या घटनेमुळे आमच्या मनोधैर्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही अधिक जोमाने प्रचार करू.'' धमकी मिळाल्यावरही विचलीत न होता पाटील यांनी प्रचार सुरू ठेवला आहे. दरम्यान या बाबत खडक पोलिस ठाण्यात विचारणा केली असता, कॉलच्या आधारे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अरुण लाड, मनसेकडून रुपाली पाटील ठोंबरे, अपक्ष श्रीमंत कोकाटे आदी निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात सुमारे 4 लाख 26 हजार मतदार असून त्यातील 1 लाख 36 हजार मतदार पुण्यातील आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduate voter Election MNS candidate rupali patil got threat call