esakal | Coronavirus : पुणे, पिंपरीतील झोपडपट्टयांत धान्य पोचविले जाणार 

बोलून बातमी शोधा

Ration-Shop

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे धान्य एकदमच दिले जाणार आहे. या योजनांच्या झोपडपट्टयांमधील लाभार्थ्यांना हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाणार आहे. चालू एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच धान्य वितरणास सुरुवात होणार आहे.

Coronavirus : पुणे, पिंपरीतील झोपडपट्टयांत धान्य पोचविले जाणार 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे धान्य एकदमच दिले जाणार आहे. या योजनांच्या झोपडपट्टयांमधील लाभार्थ्यांना हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाणार आहे. चालू एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच धान्य वितरणास सुरुवात होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने वरील निर्णय घेतला आहे. सध्या एप्रिल 2020 करीता 3 हजार 868.50 मेट्रिक टन गहू आणि 2 हजार 548 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोचविण्यात आले आहे. त्याचे वाटप 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तर मे आणि जून महिन्यांसाठी 7 हजार 737 मेट्रिक टन गहू आणि 5 हजार 96 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना 10 एप्रिलपासून देण्याचे नियोजन कार्यालयाने केले आहे. हे धान्य केवळ अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनाच वाटप केले जाणार आहे. 

शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या,""सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्याच्यादृष्टीने निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. एका वेळापत्रकानुसार दुकानदार 10 शिधापत्रिकाधारकांना दूरध्वनी करुन धान्य घेण्यासाठी बोलवतील. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी दुकानावर गर्दी करु नये. "सोशल डिस्टन्सिंग' राखण्याकरीता दुकानासमोर 1 मीटर अंतर राखून मार्किंग करण्यात येत आहे. आवश्‍यकतेनुसार, दुकानांवर पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या झोपडपट्टी भागांत धान्य द्वारपोच करण्याचे नियोजन केले गेले आहे. या दोन्ही शहरांतील झोपडपट्टयांत एकूण 270 दुकाने आहेत. त्याद्वारे हे धान्य त्यांच्या दारापर्यंत पोचविले जाईल. प्रत्येक वस्तीसाठी धान्य वाटपाचे वेळापत्रक निर्धारित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे, धान्य वितरण करण्यापूर्वी शिधापत्रिकाधारकांना कळविले जाईल. शिधापत्रिकाधारकांच्या सोयीसाठी त्यांच्या मागणीनुसार दुकानदारांना शासकीय धान्यासोबत तेल, डाळ, साखर, साबण, मीठ आदी इतर जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.'' 

शिधापत्रिकाधारकांच्या तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन 
- टोल फ्री क्रमांक - 1077, मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8 ते रात्री 8), मोबाईल क्र. 9405163924