
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक १२ हजार ८३७ खातेदारांनी मिळून एकूण ४२ लाख २८ हजार ८३२ रुपयांचा कर भरला आहे.
Pune : लोकअदालतीतील तडजोडीतून ग्रामपंचायतींनी तब्बल ३१ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी केली वसूल
पुणे - जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने गावा-गावातील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीतील तडजोडीतून ग्रामपंचायतींना ३१ कोटी ३९ लाख १ हजार ६३२ रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील ६१ हजार १७३ इतक्या खातेदारांकडून ही रक्कम मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक १२ हजार ८३७ खातेदारांनी मिळून एकूण ४२ लाख २८ हजार ८३२ रुपयांचा कर भरला आहे. या लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वाधिक ६ कोटी ५६ लाख ८७ हजार ५३५ रुपयांची कर वसुली ही मावळ तालुक्यात झाली असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतींमार्फत घरपट्टी, पाणीपट्टी आकारली जाते. यासह दिवाबत्तींसह अन्य काही किरकोळ करांची कुटुंबनिहाय आकारणी ग्रामपंचायती करत असतात. हा कर दरवर्षी वार्षिक पद्धतीने आकारला जातो. अनेकदा ग्रामस्थ हा कर नियमितपणे भरत नाहीत. त्यामुळे कर न भरणाऱ्या नागरिकांकडील ग्रामपंचायत कराची थकबाकी वाढत असते. त्यामुळे ही थकबाकी तडजोडीच्या माध्यमातून वसूल व्हावी आणि ग्रामस्थांचीही थकबाकीही सुटका व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते.
तालुकानिहाय करवसुली (रुपयांत)
- आंबेगाव --- ४२ लाख २८ हजार ८३२ रुपये
- बारामती --- ८७ लाख ७ हजार २७१
- भोर --- २ कोटी २४ लाख २७ हजार ६३०
- दौंड --- ३ कोटी २० लाख ६८ हजार २७३
- हवेली --- २ कोटी १३ लाख ६९ हजार २९०
- इंदापूर --- १३ लाख ९ हजार ४६८
- जुन्नर --- २ कोटी १९ लाख ३१ हजार ३५५
- खेड --- २ कोटी ७१ लाख ९ हजार ९०
- मावळ --- ६ कोटी ५६ लाख ८७ हजार ५३७
- मुळशी --- ४ कोटी ५४ लाख ८५ हजार ४६१
- पुरंदर --- ३० लाख ९२ हजार ५४७
- शिरूर --- ५ कोटी ८६ लाख ८४ हजार १७८
- वेल्हे --- १८ लाख ७००.
या लोक अदालतींमुळे ग्रामपंचायत करांची थकबाकी वसूल करण्यास ग्रामपंचायतींना मोठा आधार मिळाला आहे. शिवाय थकबाकीदारांना याचा फायदा झाला आहे. भविष्यातही अशा पद्धतीने लोक अदालतीचे आयोजन करून कर थकबाकी वसुलीची मोहीम राबविली जाणार आहे.
- सचिन घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, पुणे.