esakal | शैक्षणिक ‘दीक्षा’ अ‍ॅपमध्ये व्याकरण अन् भाषेच्या चुका
sakal

बोलून बातमी शोधा

Diksha Apk

शैक्षणिक ‘दीक्षा’ अ‍ॅपमध्ये व्याकरण अन् भाषेच्या चुका

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या ‘दीक्षा अॅप’ मध्ये क्यूआर कोड स्कॅन करताच पाठात व्याकरण आणि भाषेच्या अनेक चुका आढळल्या आहेत. शब्दांचे उच्चारदेखील अशुद्ध असल्याने शिक्षक व पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तांत्रिक चुकांची आणि व्याकरणाची दुरुस्ती करून अॅप अद्ययावत करण्याची, मागणी होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या आहे.

हेही वाचा: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण व्हावा या उद्देशाने पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदेने माहिती तंत्रज्ञानावर आधारित ‘दीक्षा’ अ‌ॅपची निर्मिती केली आहे. राज्य पाठयपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाने विद्यार्थ्यांना दिलेल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर एक सूचना दिली आहे.

त्यात असे म्हटले आहे की, पाठाच्या पहिल्या पानावर दिलेला क्यूआर कोड दीक्षा अॅपद्वारे स्कॅन करून पाठासंबंधित उपयुक्त दृकश्राव्य व्हिडिओ उपलब्ध होतील, अशी सूचना आहे. मात्र विद्यार्थ्यांनी हा ‘क्यूआर कोड’ दीक्षा अॅपवर स्कॅन केल्यावर त्या पाठातील व्याकरणाच्या दृष्टीने अनेक चुका दिसून येत आहेत. त्याचबरोबर ध्वनी व्यवस्थित ऐकू येत नाही. या अॅपमधील सदोष शब्द विद्यार्थ्यांच्या अशुद्धच अंगवळणी पडत आहेत. अशा शब्दांचे चुकीचे उच्चार विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्या भाषाशैलीवरदेखील विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अ‌ॅप अपडेट करण्याची गरज

दोन वर्षापूर्वी ‘दीक्षा अ‌ॅप’ची निर्मिती केली आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओ आहेत. पण अनेक व्हिडीओमध्ये इयत्तांचाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे अ‌ॅपमध्ये विविध बाबींची सुधारणा करून अपडेट करण्याची गरज असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.

तिसरीचे एकच पुस्तक पेपर मात्र दोन

विद्यार्थ्यांची उजळणी पक्की व्हावी, यासाठी ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम सुरू केला आहे. इयत्ता तिसरीचे ‘परिसर अभ्यास’ हे एकच पुस्तक असताना चाचणी क्रमांक तीन च्या पेपरमध्ये परिसर अभ्यास १ व परिसर अभ्यास २ असे दोन पेपर दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये पुरता गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षक देखील संभ्रमात आहेत. एक पेपरमध्ये सामान्य ज्ञान व दुसऱ्या पेपरमध्ये प्राणी पक्षी यांच्या विषयी माहिती असे वर्गीकरण करून तशी (टेस्ट) चाचणी बनवलेले आहे. पुस्तक एकच आहे, पण दोन भाग करून तशी चाचणी काढण्यात आली.

अशा आहेत चुका

परिस्थिती ऐवजी परिसतीती , अन्नपदार्थ ऐवजी अन्पदार्थ, रोगजंतू ऐवजी रोगजन्तु, गॅस्ट्रो ऐवजी ग्यास्ट्रो ,किंवा ऐवजी किव्वा, बदललेला ऐवजी बद्दलेला, ब्रह्मपुत्र ऐवजी ब्रह्मपुत, असे शब्द वापरले आहेत. यापेक्षाही अधिक चूका आहेत. त्यामध्ये काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार यांचा चुकीचा उल्लेख या अॅपमध्ये करण्यात आला आहे.

loading image
go to top