ग्रामपंचायतीमध्ये नोंद नसताना १०० टक्के करवाढ; सामान्यांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road

ग्रामपंचायतीमध्ये नोंद नसताना १०० टक्के करवाढ; सामान्यांची फसवणूक

उंड्री : पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या २३ गावांना करआकारणी करण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासन सरसावले आहे. ग्रामपंचायतीमध्ये घराची नोंद नाही, तरीसुद्धा १०० टक्के करवाढ आकारण्याचा निर्णय, ही सामान्यांची फसवणूक आहे. आमच्याकडे असुविधा आहेत, तुम्ही त्यामध्ये भर नका घालू, किमान पाणी, रस्ता, आरोग्य या सुविधा तरी द्या, त्यानंतर करआकारणी करा, असा सबुरीचा सल्ला ग्रामस्थांकडून राज्यकर्ते आणि पालिका प्रशासनाला दिला आहे.

काळेबोराटेनगर रेल्वे स्टेशन ते भोसले व्हिलेज रस्त्यावर पादचारी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या दुर्तफा कचरा साचला असून, मोकाट डुकरे- कुत्री-जनावरांचाही वावर वाढला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे येथील नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा: Ukraine Crisis: सोलापूर जिल्ह्यातील 16 विद्यार्थी सुखरूप दिल्लीला पोहचले

उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, वडाचीवाडी-औताडेवाडी, होळकरवाडीतील ग्रामस्थ म्हणतात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये पीएमपी दस मे बस, उद्यान, बगीचा या गोष्टींचा नंतर बघू, सध्या किमान पाणी, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवेसाठी एखादे छोटेसे रुग्णालय तरी द्या आणि मग करवाढ करा, असा सबुरीचा सल्ला ग्रामस्थांकडून दिला जात आहे.

राज्य सरकारने शहराच्या बांधावरची २३ गावे १ जुलै २०२१ पासून महापालिकेत समाविष्ट केली आहेत. या गावांना १ एप्रिल २०२२ पासून पालिकेचा मिळतकर लावला जाणार आहे. त्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर मुख्यसभेची परवानगी आवश्यक आहे. महापालिकेने २०१७ साली ११ गावे समाविष्ट करून घेतली, त्यांनाच अद्याप पायाभूत सुविधा मिळत नाहीत. तरीसुद्धा भरमसाठ कर लावला गेला आहे. त्यामुळे आमची ग्रामपंचायत बरी होती, महापालिका नको, त्रासिक भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

कामगार कष्टकरी वर्गाने अर्धा-एक गुंठा जागा छोटेखानी निवारा बांधला आहे, त्याच्या नोंदीसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला,पण त्याची नोंदणी होऊ शकली नाही. अशा नागरिकांनासुद्धा १०० टक्के कर लावला जाणार आहे. पेठांमध्ये सुविधा देतात, त्यातील किमान एक टक्का तरी सुविधा आम्हाला द्या, त्यानंतर करआकारणी करावी.

-गजानन मोहिते, काळेबोराटेनगर

पिण्यासाठी पुरेसे पाणी, गावात जाण्यासाठी धड रस्ता, पथदिवे, सांडपाण्याची व्यवस्था नाही, तरीसुद्धा वाढीव करआकारणी करून सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार प्रशासनाकडून केला जात आहे, ही बाब योग्य नाही.

-धनंजय हांडे, हांडेवाडी

महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर किमान पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा मिळतील, अशी आशा होती. मात्र, यापैकी कोणतीही सुविधा मिळाली नाही. पाणी विकत घ्यावे लागत आहे, खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे, हा मनस्ताप राज्यकर्ते आणि प्रशासनाने दिला आहे.

-खंडेराव जगताप, हांडेवाडी

Web Title: Grampanchayat Registration Tax Increase Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newstax