
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या निवडीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
पुणे - उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या निवडीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 व 25 फेब्रुवारीला करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी बुधवारी(ता. 17) या तालुक्यांमधील 269 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या निवडी 9 आणि 10 फेब्रुवारीला होणार होत्या. परंतु राज्य सरकारने निवडणूक निकालानंतर जाहीर केलेल्या सरपंच आरक्षणाला काही गावांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याबाबत राज्यभरातून सुमारे 35 आव्हान याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकांवरील सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नव्याने सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 9 फेब्रुवारीला यावर सुनावणी घेतली होती.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बारामती तालुक्यातील निंबूत, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, मावळ तालुक्यातील परंदवडी आणि खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, नाणेकरवाडी आणि बिरदवडी या गावांमधील काही ग्रामस्थांनी आव्हान याचिका दाखल केल्या होत्या. या चार तालुक्यातील निवडणूक झालेल्या सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडींना स्थगिती मिळाली होती.
हे वाचा - सावधान! पुणेकरांनो कोरोना वाढतोय बरं का, काळजी घ्या
पुणे, जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 15 जानेवारीला झाल्या होत्या. या निवडणुकीचे निकाल 18 जानेवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर 29 जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते.