esakal | देहविक्री करणाऱ्या महिलांचे अनुदान कष्टकरी महिलांच्या खात्यावर; चौकशीची मागणी

बोलून बातमी शोधा

देहविक्री करणाऱ्या महिलांचे अनुदान कष्टकरी महिलांच्या खात्यावर; चौकशीची मागणी
देहविक्री करणाऱ्या महिलांचे अनुदान कष्टकरी महिलांच्या खात्यावर; चौकशीची मागणी
sakal_logo
By
अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना कोरोनाच्या संकटात देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम काही कष्टकरी महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भ्रष्ट कारभारात सहभागी असलेल्या कथित स्वयंसेवी संस्था आणि अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी गुरुवारी कष्टकरी महिलांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रक्कम परत घेण्याची मागणी केली होती. देहविक्री करणार्‍या स्त्रियांच्या सहाय्य योजनेतील फसवणुकीने जमा झालेले पैसे आमचे नसून ते परत घ्यावेत. हे कारस्थान रचणार्‍यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कष्टकरी महिलांनी केली.

स्वयंसेवी संस्थेच्या म्हणवणाऱ्या तीन महिलांनी हडपसर भागातील घरकामगार, मोलकरीण, कष्टकरी महिलांना गाठले. त्यांनी केंद्र सरकारच्या योजनेतून घरकामगार, मोलकरीण यांना प्रत्येकी 15 हजारांची मदत करणार आहोत. त्यासाठी तुमचे आधारकार्ड, फोटो, रेशनकार्ड व बँकेचे पासबुक द्या. काही दिवसातच पैसे जमा होतील. त्यातील निम्मे आम्हाला परत करावे लागतील, असे सांगितले. त्यावर टाळेबंदीने झालेल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कष्टकरी अल्पशिक्षित, निरक्षर महिलांनी कागदपत्रे विश्वासाने संस्थेच्या महिलांच्या हवाली केली. यापैकी काही महिलांच्या खात्यावर 23 एप्रिलला प्रत्येकी 15 हजार रुपये अनुदान जमा झाले.

हेही वाचा: पोटची मुलं गेली पण आजी खचली नाही; नातवांसाठी राबण्याची जिद्द वाखाणण्याजोगी

त्यानंतर संस्थेच्या महिला व इतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे त्यातील निम्मी रक्कम परत मागण्यास सुरवात केली. दरम्यान, देहविक्री करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या अनुदान रक्कम योजनेत कष्टकरी महिलांचा समावेश करून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावर स्वतः कष्टकरी महिलांनी सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार आणि अखिल भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक नीलेश वाघमारे यांना आपली कैफियत ऐकवली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निदर्शने केली. तसेच, फसवणूक करून दिलेली रक्कम परत घ्यावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

हा प्रकार गंभीर असून, या भ्रष्ट कारभाराची पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी. यात दोषी आढळलेल्या संस्था आणि व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा.

- नितीन पवार, सामाजिक कार्यकर्ते