esakal | यावर्षी दिव्यांगाची दिवाळी अंधारातच
sakal

बोलून बातमी शोधा

Grants for three months Sanjay Gandhi Niradhar Pension Scheme for 3500 disabled persons in Ambegaon taluka have not been deposited in the bank account yet 2.jpg

आंबेगाव तालुक्यातील तीन हजार ५०० दिव्यांगाची ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्याची संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे अनुदान बँक खात्यात अजून जमा झाले नाहीत.

यावर्षी दिव्यांगाची दिवाळी अंधारातच

sakal_logo
By
डी.के वळसे-पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील तीन हजार ५०० दिव्यांगाची ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्याची संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे अनुदान बँक खात्यात अजून जमा झाले नाहीत. त्यामुळे दिव्यांगांची उपासमार व हालअपेष्टा सुरू आहेत. पेन्शन अभावी दिव्यांगांची दिवाळी अंधारातच होणार आहे.
  
कोरोनाच्या महामारीमुळे रोजगार नसल्याने अपंगांची अवस्था दयनीय झाली आहे. दिव्यांग सेवा संस्था, प्रहार अपंग संघटनेचे आंबेगाव तालुक्याचे प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, समीर टाव्हरे, सुनील दरेकर, मुन्ना इनामदार, मंगल धोत्रे यांनी सकाळ प्रतिनिधी जवळ दिव्यांग यांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले घोडेगाव तहसीलदार कचेरीत पेन्शन कधी मिळणार अशी विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर तहसीलदार कचेरीतील अधिकारी अक्षरशः अंगावर धावून येतात.

'आमच्या हातात काहीच नाही. सारखे सारखे भेटून आम्हाला त्रास देऊ नका. आमच्याकडे पैसे आल्यानंतर तुमच्या खात्यावर जमा करू' असे सांगून आमची बोळवण करतात. गेली तीन महिने दिले जाणार असे आश्वासन कधी पूर्ण होणार हा मोठा प्रश्न आहे. संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची अनेक प्रकरणे जून महिन्यापासून पडून आहेत, पण तहसीलदार कचेरीकडून याबाबत कार्यवाही केली जात नाही. राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मेलद्वारे निवेदन पाठवून न्याय देण्याची मागणी करणार आहे. 

हे ही वाचा : बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा घेतला पवित्रा

दिवाळी हा सन तर आमच्यापासून दूरच

शिनोली (ता. आंबेगाव) येथे राहणाऱ्या ललिता काशिनाथ बोऱ्हाडे यांचे एम.ए. पर्यंत शिक्षण झालेले आहे. पूर्वी त्या पुणे येथे सत्र न्यायालयाच्या बाहेर अर्ज डीटीपी करून देण्याचे काम करत होत्या. पण कोरोनाची साथ व लॉकडाऊनमुळे काम ठप्प झाल्याने त्या शिनोली गावी आल्या. त्या म्हणाल्या वयाच्या पाचव्या वर्षी अपंगत्व आले. दोन्ही पाय कृत्रिम आहेत. लहान असताना वडिलांचा मृत्यू झाला.

वृद्ध आई व पाच वर्षाची मुलगी आहे. पेन्शनची रक्कम मिळेल. या अपेक्षेवर दुकानदारांकडून उधारीवर किराणामाल घेतला आहे. पण त्यांचे पैसे वेळेत देता आले नाही. त्यामुळे आता दुकानदारांनी किराणामाल देणे बंद केले आहे. उलट  तगादे सुरू झाले आहेत. दिवसभर पोटाची खळगी कशी भरायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर बसून कटलरी विकत आहे. दिवाळी हा सन तर आमच्यापासून दूरच आहे. हे सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. 
  
संपादन - सुस्मिता वडतिले