महिला सक्षमीकरणातून महासत्ता - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

‘‘महिलांच्या सक्षमीकरणातूनच देश महासत्ता होईल. विकासाचा दर दुपटीने वाढेल,’’ असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. ३०) व्यक्त केला.

पिंपरी - ‘‘महिलांच्या सक्षमीकरणातूनच देश महासत्ता होईल. विकासाचा दर दुपटीने वाढेल,’’ असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. ३०) व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवांजली सखी मंचतर्फे भोसरीतील गावजत्रा मैदानावर आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, शिवांजलीच्या प्रमुख पूजा लांडगे आदी उपस्थित होते. प्रतीक्षा लांडगे (बाल कबड्डीपटू), सह्याद्री भुजबळ (बालगिर्यारोहक), आकाश बांदल (कलाकार), सुरेश चिंचवडे (सामाजिक कार्य) यांना ‘इंद्रायणी थडी पुरस्कार’ देऊन गौरविले. 

फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यात युतीचे सरकार २०१४ मध्ये स्थापन झाले. त्या वेळी साडेतीन लाख कुटुंब बचत गटात होती. त्यानंतरच्या पाच वर्षांत चाळीस लाख कुटुंब बचत गटांच्या माध्यमातून जोडली गेली आहेत. त्यातील अनेक बचत गटांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाचा लाभ मिळाला आहे. महिलांचा सामाजिक व आर्थिक थर उंचावण्यासाठी ‘इंद्रायणी थडी’चा उपक्रम मार्गदर्शक ठरेल.’’

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्यातील सर्वांत उंच १४० फुटांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. त्याच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणावे, अशी विनंती आमदार लांडगे यांनी फडणवीस यांना केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great power through women empowerment says devendra fadnavis