मोशीत सिंगापूरच्या सेन्टॉसा पार्कप्रमाणे प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

- मोशीतील 'सफारी पार्क'ला हिरवा कंदील
- दीड हजार कोटी खर्च अपेक्षित

पिंपरी (पुणे) : बहुचर्चित मोशीतील नियोजित सफारी पार्कला राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी (ता. 3) मान्यता दिली. सिंगापूर येथील सेन्टॉसा पार्कच्या धर्तीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने प्रकल्प साकारणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, एक हजार कोटींचा निधी तातडीने थेट परकी गुंतवणुकीच्या (एफडीआय) माध्यमातून उपलब्ध होणार आहे. उर्वरित निधी राज्य सरकार आणि महापालिका करणार आहे. 

मोशीतील गायरानाची जागा पुणे महापालिकेने कचरा डेपोसाठी मागितली होती. त्याला विरोध करून सफारी पार्क उभारण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यासंदर्भात पर्यटनमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबईत बैठक झाली. आमदार लांडगे, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक राम पवार यांच्यासह पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
बैठकीची माहिती देताना आमदार लांडगे यांनी सांगितले की, मोशीतील सफारी पार्कची आरक्षित जागा तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सफारी पार्कसाठी पर्यटन विभाग निधीची कमतरता भासू देणार नाही. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने सादर करा. त्याला तत्काळ मान्यता दिली जाईल, असे पर्यटनमंत्री रावल यांनी सांगितले व सफारी पार्क उत्तम प्रेक्षणीय स्थळ करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. 

मोशीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी पार्कमुळे समाविष्ट गावांच्या विकासांना आणखी चालना मिळणार आहे. तीन वर्षांत प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पामुळे मोशी, चऱ्होली, चिखली, भोसरी भागातील उद्योग, व्यवसायाची वृद्धी होणार आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. बांधकाम व्यवसायाला फायदा होईल. 
- महेश लांडगे, आमदार, भोसरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: green signal to safari park in moshi