बारामतीकरांना असा मिळतोय किराणा...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवाडा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच कशा द्यायच्या हा प्रशासनापुढे प्रश्न होता. त्यातूनच किराणा होम डिलिव्हरी या ऍपची निर्मिती झाली. 

बारामती : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते, मात्र, अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली अनेकजण रस्त्यावर फिरत असताना दिसत होते. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवाडा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच कशा द्यायच्या हा प्रशासनापुढे प्रश्न होता. त्यातूनच किराणा होम डिलिव्हरी या ऍपची निर्मिती झाली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऍप विकसित करुन आज ते बारामतीकरांसाठी खुले करुन दिले आहे. विशेष म्हणजे पोलिस कर्मचरी स्वप्नील अहिवळे, विशाल जावळे, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार यांनी यात पुढाकार घेतला आहे.

बारामती शहराचे विविध विभाग करुन त्यात अत्यावश्यक सेवा पुरविणा-या पुरवठादारांची यादी टाकण्यात आली आहे. नागरिक ज्या भागात वास्तव्य करतात, तो भाग निवडून हवी ती वस्तू या ऍपमध्ये टाकल्यास संबंधित पुरवठादारास ती मागणी जाऊन ग्राहकांना घरपोच माल पोहोच केला जाणार आहे. या ऍपचा वापर नागरिकांना करण्यास प्रारंभ केला असून, यामुळे नागरिक रस्त्यावर येण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. 

दरम्यान, पोलिसांनी आजपासून किराणा दुकानांनाही होम डिलिव्हरी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. त्यामुळे या ऍपच्या माध्यमातून लोक किराणा मालाची खरेदी करु लागल्याचे प्रशासनाने आज सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grocery Delivery App Launch for Peoples of Baramati