अजरामर स्वरांनी सजली नववर्षाची पहाट; गीत रामायणाच्या सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध

‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’, ‘सूड घे त्याचा लंकापति’, ‘त्रिवार जयजयकार’...
Geet Ramayana
Geet Ramayanasakal

पुणे : ‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’, ‘सूड घे त्याचा लंकापति’, ‘त्रिवार जयजयकार’... अशा गीत रामायणातील अजरामर गाण्यांच्या स्वरांनी पुणेकरांनी नववर्षाचा प्रारंभ केला. या गाण्यांचे सुरेल सादरीकरण करणारे आनंद माडगूळकर व त्यांचे सहकारी आणि त्यांच्या सादरीकरणाला तन्मयतेने दाद देणारे रसिक, असे दृश्य शनिवारी पहाटे साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे पाहायला मिळाले.

निमित्त होते ‘सकाळ’तर्फे आयोजित व गदिमा व्यासपीठातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘गीत रामायण’या कार्यक्रमाचे. ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’तर्फे प्रस्तुत या कार्यक्रमाला कोहिनूर ग्रुपचे सहप्रायोजकत्व लाभले होते. ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या दिग्गजांच्या ‘गीत रामायण’ या अलौकिक कलाकृतीचे गारूड आजही कायम असल्याचा प्रत्यय यावेळी आला. गुढीपाडवा आणि नववर्षाचा प्रारंभ ‘गीत रामायणा’च्या स्वरांनी करण्यासाठी आलेल्या रसिकांनी बालगंधर्व रंगमंदिर ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. उपस्थितांपैकी प्रत्येकच रसिक गायकांसह गाण्यांच्या ओळी उद्धृत करत आजही मराठी जनांना संपूर्ण गीत रामायण मुखोद्गत असल्याची साक्ष देत होता.

‘स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती’ या गाण्याने ज्येष्ठ गायक आणि गदिमा व्यासपीठाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद माडगूळकर यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतर ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘सांवळा गं रामचंद्र’, ‘चला राघवा चला’, ‘जेथे राघव तेथे सीता’ आदी गाण्यांतून रामकथा उलगडत गेली. कैकयीवर प्रक्षुब्ध झालेल्या भरताच्या तोंडी असणारे ‘माता न तु वैरिणी’ हे गीत आनंद माडगूळकर यांनी अफाट उर्जेने सादर केल्यावर रसिकांचा उत्फूर्त ‘वन्स मोअर’ मिळाला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’, ‘सूड घे त्याचा लंकापति’, ‘तोडिता फुले ही’, ‘सेतु बांधा रे सागरी’ आदी गाणी सादर झाली. माडगूळकर यांच्यासह राजेश दातार, हेमंत वाळूंजकर, जयश्री कुलकर्णी आणि मीनल पोंक्षे यांनी ही गीते सादर केली. त्यांना आनंद गोडसे व राजेंद्र हसबनीस (तबला), विवेक परांजपे (सिंथेसायझर), प्रसन्न बाम (संवादिनी), चारूशीला गोसावी (व्हायोलीन) आणि अवधूत घायगुडे व मनोज खटावकर (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. तर अमिता गोडबोले व सहकाऱ्यांनी ‘स्वयंवर झाले सीतेचे’ आणि ‘त्रिवार जयजयकार’ ही दोन गाणी नृत्यातून सादर केली. कार्यक्रमाची संकल्पना हर्षदा माडगूळकर-उटगीकर यांची होती.

‘गीत रामायणा’च्या निर्मितीमागील खुमासदार किस्से

यावेली आनंद माडगूळकर यांनी गीत रामायणाच्या निर्मितीवेळचे खुमासदार किस्से सांगत कार्यक्रमांची रंगत वाढवली. रामजन्माचे गाणे लिहिण्यासाठी गदिमा सायंकाळपासून बैठक मारून बसले, मात्र रात्र झाली तरी एकही ओळ सुचली नसल्याचे पाहून गदिमांच्या पत्नीने त्यांना ‘झाला की नाही रामाचा जन्म अजून?’, असा मार्मिक प्रश्न विचारल्याचा किस्सा माडगूळकर यांनी सांगताच सभागृहात हास्याची लकेर पसरली.तर, ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी गाण्याचा कागदच हरवल्याने गदिमांना ते गाणे पुन्हा लिहावे लागले होते, मात्र केवळ एक ओळ वगळता संपूर्ण गाणे त्यांनी जसेच्या तसे लिहून काढले, ही आठवण सांगताच रसिकांनी गदिमांच्या प्रतिभेला दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com