Video : आजचे विषय भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र; ‘सकाळ’चे मार्गदर्शन

HSC
HSC

पुणे : बारावी परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांना जरा टेन्शन येतंच. आता तर ही परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ती अगदी सोपी होण्यासाठी ‘सकाळ’नं पुढाकार घेतला आहे. त्यामुळं या परीक्षेचं टेन्शन अजिबात घेऊ नका. तुम्हाला आता दररोज एका विषयाचं मार्गदर्शन तज्ज्ञ शिक्षकांकडून मिळणार आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला ‘सकाळ’च्या फेसबुक पेजवर पाहायला मिळतील. 

या व्हिडिओमध्ये परीक्षेसाठी आवश्‍यक आणि तुमच्या गुणांमध्ये निश्‍चित वाढ करून देणाऱ्या टिप्स तज्ज्ञांकडून दिल्या आहेत. तुम्ही फक्त हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यानुसार अभ्यास करायचा आहे. बघा, तुम्हाला यश हमखास मिळेलच.

आजचा व्हिडिओ : विषय : भौतिकशास्र 
मार्गदर्शक : नारायण कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी 

- परीक्षेची तयार करताना मानसिक दडपण घेऊ नका. पाठ्यपुस्तक पूर्णपणे समजून घ्या. 
- व्याख्या, सिद्धांत, कायदे हे पाठ्यपुस्तकाप्रमाणे लिहिल्यास त्याचे पूर्ण गुण मिळतात. 
- बहुपर्यायी प्रश्‍न सोडविताना ए, बी, सी, डी यापैकी पर्याय, तसेच त्याचे उत्तर; असे दोन्ही लिहिणे अपेक्षित आहे. फक्त ए, बी, सी, डी अशा प्रकारची वर्णाक्षरे लिहिल्यास गुण मिळत नाहीत. 
- एकापेक्षा अधिक पर्याय आणि पर्यायांमध्ये खाडाखोड करू नये. उत्तराने संभ्रम निर्माण होत असेल, तर गुण मिळत नाहीत. 
- प्रश्‍न काळजीपूर्वक वाचा. मन एकाग्र करून काय लिहावयाचे आहे, हे समजून उत्तरे लिहा. प्रश्‍न घाईत वाचल्यास चूक होऊ शकते. 
- मुद्देसूद उत्तरे लिहिण्याची तयारी करा. आकृती काढताना प्रमाणबद्ध असावी. "रिझोल्यूशन ऑफ व्हेक्‍टर्स' योग्य पद्धतीने दाखवा. लेबलिंग दाखविणे गरजेचे आहे. आकृत्या पेन्सिलनेच काढाव्यात. 
- ज्या प्रश्‍नाला आकृती काढणे अपेक्षित आहे, तिथे आकृती आणि त्याचे स्पष्टीकरण आकृतीशी सुसंगत असावे. 
- नवीन प्रश्‍न हा नवीन पानावरच सुरू करावा. एका प्रश्‍नाचे उत्तर संपल्यावर पुढचा प्रश्‍न सोडवावा. एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर आठवत नसेल, तर त्यासाठी मोकळी जागा ठेवावी. 
- विविध उपप्रश्‍नांची उत्तरे एका पाठोपाठ एक वा संमिश्र परीक्षकाचा आणि नियामकाचा बराच वेळ खर्ची पडतो. या गोष्टी टाळाव्यात. 
- डेरिव्हेशन लिहिताना फक्त मॅथेमॅटिकल स्टेप लिहिण्याचे टाळावे. ते सुरू करतानाच्या आकृत्या आणि स्पष्टीकरण महत्त्वाचे असते. दोन मॅथेमॅटिकल स्टेप/इक्वेशन जोडणारे पदार्थविज्ञान विषयाशी संबंधित स्पष्टीकरण (डिस्क्रिप्शन) फार महत्त्वाचे असते. 
- प्रॉब्लेम सोडविताना लॉगॅरिदम टेबलचा वापर करावा. अन्यथा गुण मिळणार नाहीत. ते सोडविताना कागदाच्या उजव्या बाजूला शाईने लिहिलेले लॉग कॅलक्‍युलेशन असल्यास परीक्षकाला तपासणे सुलभ होते. 
- सर्व सूत्रे (फॉर्म्युला) एका कागदावर लिहून आपल्या नजरेसमोर ठेवल्यास ती चांगली स्मरणात राहतील. 
- जुन्या प्रश्‍नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा, बोर्डाचा पेपर होईपर्यंत अन्य परीक्षांच्या अभ्यासाचा विचार करू नका.

विषय : अर्थशास्र 
मार्गदर्शक : मनीषा काळे, केतकी कुलकर्णी 

- अर्थशास्राचा अभ्यास करताना पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन करून संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. 
- प्रश्‍नपत्रिकेमधील सूचना, प्रश्‍न काळजीपूर्वक वाचावेत. उत्तरांमध्ये अचूक सूत्रे, समीकरणे, तक्ते आणि आकृत्या यांचा समावेश करावा. आकृत्या अचूक आणि स्पष्ट असाव्यात. 
- उत्तरे मुद्देसूद लिहावीत आणि मुद्द्यांना अधोरेखित करावे. उत्तरामधील आशय महत्त्वाचा असल्याने किती लिहितो यापेक्षा काय लिहितो याकडे लक्ष द्यावे. 
- उत्तरे लिहिताना वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सराव आवश्‍यक आहे. 
- उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहिताना निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईचे पेन वापरावेत. इतर रंगीत शाई वा व्हाइटनर यांचा वापर करू नये. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांची उत्तरे लिहिताना शक्‍यतो, त्याचा क्रम बदलू नये. 
- सूक्ष्म अर्थशास्र आणि स्थूल अर्थशास्र पाठ्यपुस्तकातील या दोन्ही विभागांचा सखोल अभ्यास करावा. 
- दिव्यांग/अंध विद्यार्थ्यांनी आपल्या लेखनिकाला योग्य सूचना द्याव्यात. आकृत्यांचे प्रश्‍न कठीण वाटत असल्यास विश्‍लेषणात्मक प्रश्‍नांची निवड करावी. 
- अर्थशास्त्रीय भाषा, संकल्पना यांचा वापर आपल्या लेखनात करावा. 
- फरक स्पष्ट करा, कारणे द्या या प्रश्‍नांमध्येदेखील सूत्र, आकृत्या, तक्ते, समीकरण यांचा योग्य तो समावेश करावा. 
- आकृत्यांसाठी स्वतंत्र आलेख पेपर दिला जात नाही. उत्तरपत्रिकेवरच आकृती काढावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com