बारामतीत ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 30 लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 March 2020

- पुणे ग्रामीण पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी गुटखा जप्तीची कारवाई केली

बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी गुटखा जप्तीची कारवाई केली आहे. बारामतीतून तब्बल 30 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष लक्ष्मण गायकवाड (रा. वसंतनगर, बारामती), हरी दगडू नवले (रा. शिक्षक सोसायटी, कसबा, बारामती) या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बारामतीतील काही जण गुटख्याचा अवैध साठा करुन आजूबाजूच्या गावांमध्ये गुटखा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचबरोबर बारामतीतील कसबा व वसंतनगर परिसरात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने हालचाल करत बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांना छापा मारुन कारवाईचे आदेश दिले. 

पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलिस निरिक्षक सचिन शिंदे, पोलिस कर्मचारी सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, भाऊसाहेब मोरे, गणेश नांदे,  सिध्देश पाटील, राजेश गायकवाड, रामदास जाधव यांनी कारवाई केली.

कसब्यातील गोदामातून 19 लाखांचा तर वसंतनगरच्या गोदामातून 11 लाखांचा अवैधरित्या साठवून ठेवलेला गुटखा जप्त करण्यात आला. या संदर्भात अन्न व औषध प्रशासनास माहिती दिली असून बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutka seized of Rs 30 Lakhs