एचए कामगारांनी सोडला घराचा ताबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

कुटुंबासमोर गुन्हेगार ठरलो
‘‘गेल्या २५ वर्षांपासून आम्ही कॉलनीत राहत आहोत. माझी १० ते १५ वर्षांची सेवा शिल्लक होती. मात्र, इच्छा नसतानाही स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. कुटुंबाला न्याय देऊ शकलो नाही. त्यांच्यापुढे आम्ही गुन्हेगार ठरलो,’’ असे हताश उद्‌गार स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांनी काढले. 

निरोप समारंभ
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या दोनशे कामगारांना निरोप समारंभ झाला. केंद्र सरकारचे विभागीय कामगार आयुक्त जेएनएस चौधरी प्रमुख पाहुणे होते. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ अध्यक्षस्थानी होत्या. २५० पैकी दोनशे कामगार कार्यक्रमाला उपस्थित होते. एचए कॉलनीमधील काही स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांना विशेष बाब म्हणून एक महिन्याची वाढीव मुदत दिली. त्यांच्याकडील निरनिराळ्या देणी रक्कम अदा झाल्यावर निवासस्थाने खाली करण्याची मुभा व्यवस्थापनाने दिली आहे.

पिंपरी - शहराच्या औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स कंपनीमधील (एचए) स्वेच्छानिवृत्त कामगारांनी अखेर एचए कॉलनीमधील त्यांच्या घराचा ताबा सोडण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत सुमारे ५० कामगार आणि त्यांच्या कुटुंबांनी घरे सोडली असून, उर्वरित कामगारांनी घर सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गोरगरीब, गरजू रुग्णांना परवडेल अशा दरात औषधे मिळावीत, यासाठी पिंपरी येथे सार्वजनिक क्षेत्रातील पहिला कारखाना एचए कंपनीच्या स्वरूपात उभा राहिला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १९५४ मध्ये त्याचे उद्‌घाटन झाले. त्यापाठोपाठ एचए कॉलनीही वसली. कॉलनीत राहून कंपनीत काहींच्या दोन पिढ्यांनीही सेवा केली. 

काही स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर परिसरातील कॉलनीच्या प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पुतळा कामगारांच्याच पुढाकाराने स्थापन झाला. सुरुवातीला एक हजार कुटुंबांपर्यंत कॉलनीचा विस्तार होता. कामगारांच्या मुलांसाठी एचए स्कूलची स्थापना झाली. मनोरंजनासाठी ओपन थिएटर होते. काही कामगारांची मुलेही कंपनीतच नोकरीला लागले.

२००६ पर्यंत पहिली स्वेच्छानिवृत्ती योजना लागू होण्यापूर्वी कॉलनी गजबजलेली असायची. २०१३ पासून कंपनीला ग्रहण लागले. कामगारांना पूर्ण पगार मिळेनासे झाले. काहींनी स्वतःचे इतरत्र फ्लॅट घेतले. मात्र, काहींची वेतनवाढ झाली नाही, तर काहींचे वेतनच कमी राहिले.

एचए कॉलनीमधील घरांसाठी कंपनीकडून सरासरी एक ते चार हजार रुपये घरभाडे आकारले जात होते. ते त्यांच्या वेतनामधून वळते करून घेतले जात असे. सध्या कॉलनीतील शंभर स्वेच्छानिवृत्तीधारकांपैकी निम्म्या कामगार कुटुंबांनी घराचा ताबा सोडला आहे.
- शंकर बारणे, माजी खजिनदार, एचए मजदूर संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HA Workers abandoned home occupation