esakal | लोकप्रतिनिधी फिरकेनात; समस्या सुटेनात! 
sakal

बोलून बातमी शोधा

hadapsa constituency

स्वच्छतागृह नाहीत, साफसफाईला महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत... डेंगी, कावीळमुळे लोक आजारी पडताहेत... विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही... पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही... स्मशानभूमीसाठी जागा नाही... आरक्षणाच्या जागा बळकावल्या जात आहेत... अशा समस्यांची भलीमोठी यादीच हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वैदुवाडी गावठाणातील नागरिकांनी ऐकवली. 

लोकप्रतिनिधी फिरकेनात; समस्या सुटेनात! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वार्तापत्र : हडपसर मतदारसंघ
पुणे-  स्वच्छतागृह नाहीत, साफसफाईला महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत... डेंगी, कावीळमुळे लोक आजारी पडताहेत... विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही... पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही... स्मशानभूमीसाठी जागा नाही... आरक्षणाच्या जागा बळकावल्या जात आहेत... अशा समस्यांची भलीमोठी यादीच हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वैदुवाडी गावठाणातील नागरिकांनी ऐकवली. 

आमच्या भागात लोकप्रतिनिधी फिरकतच नाहीत. मग समस्या कोण सोडविणार, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला. वैदुवाडी गावठाणातील रहिवासी दत्तात्रेय शिंदे, शंकर शिंदे, प्रकाश लाकडे, मुकुंद लाकडे, राजन पवार, मंजू लाकडे, राजेंद्र रॉय, आनंद लाकडे, सावकार सावंत, लालू सवारे यांच्यासह अनेकांनी या भागातील असुविधांबाबत आमदार आणि महापालिकेतील लोकप्रतिनिधींना जबाबदार धरले.

पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडईतील विक्रेते आणि ग्राहकांनीही समस्यांचा पाढा वाचला. मंडईत स्वच्छतागृह नाही. सीसीटीव्ही असूनही रात्री चोऱ्या होत आहेत. ड्रेनेज लाइन बंद असून, कचरा कुंड्या नाहीत. ग्राहकांना पार्किंग व्यवस्था नाही, अशा तक्रारी भाजी विक्रेत्या हेमलता चवंडकर, अनिल काळे, मारुती भालसंगर, कमल बनकर यांनी केली. मंडईत सुधारणा करण्यासाठी आमदार निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.  लुल्लानगर भागात उड्डाण पूल झाल्यामुळे तेथील वाहतुकीची कोंडी सुटली. खराडी बायपास उड्डाण पुलाच्या कामाला नुकतीच मंजुरी मिळाली. सय्यदनगर भागात रेल्वेगेटजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. यांसह काही विकासकामे मार्गी लागत आहेत; परंतु मेट्रोचा प्रश्‍न अधांतरी आहे. नव्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाण्यासाठी टॅंकरवर लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. कोंढवा-कात्रज-पिसोळी रस्ता तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात वाढले आहेत. या प्रश्‍नांकडे लोकप्रतिनिधींनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
हडपसर विधानसभा मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली. त्यानंतर दोन्ही निवडणुकीत येथील मतदार आधी युतीच्या आणि नंतर भाजपच्या पाठीमागे राहिला आहे. २००९ मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर येथून विजयी झाले होते. तर गेल्या निवडणुकीत भाजपचे योगेश टिळेकर यांनी शिवसेनेच्या बाबर यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वाधिक १५ नगरसेवक आहेत. त्याखालोखाल भाजपचे १० शिवसेना ३ आणि मनसेचे २ नगरसेवक आहेत. 

काय म्हणतात मतदार...
मकरंद जावळे - पाटबंधारे विभागाच्या बेबी कालव्याची कचरा कुंडी झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात आले आहे. हा कालवा भूमिगत करून वाहतूक कोंडी सोडवावी.

संजय लडकत - हडपसर-स्वारगेटदरम्यान बीआरटी मार्ग फोल ठरला आहे. त्यामुळे स्वारगेट ते पंधरा नंबर चौक या दरम्यान मेट्रो सुरू करण्याची गरज आहे. 

संगीता सावंत - काळेपडळ, महम्मदवाडी, वानवडी, कोंढव्याच्या काही भागांत अनियमित अपुरा पाणीपुरवठा होतो. वर्षभर बहुतांश सोसाट्यांमध्ये खासगी टॅंकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागते. 

निखील कापरे - रामटेकडी आणि हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणारे कचरा प्रकल्प आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जुने प्रकल्प असताना आणखी प्रकल्प कशासाठी? 

loading image
go to top